गुरुवार, 16 फ़रवरी 2017

योगसूत्र समाधिपाद सूत्र 1-51

योगसूत्र समाधिपाद
 Author -- Dr Balram Sadashiv Agnihotri
Typed by Ashwini -- To proof read
 
  अथ योगानुशासनम् ।।१।।
      आता योगशास्त्राचे विवेचन केले जाते. अथ शब्द मंगलवाचक आहे. योग म्हणजे मोक्ष मिळविण्याचे साधन, अनुशासन-परंपरेला धरून विषयाचे विवेचन.

                          योगाश्चित्तवृत्तिनिरोधः ।।२।।
   योग याचा अर्थ चित्ताच्या वृत्तींचा सर्वस्वी निरोध. भगवग्दीतेत म्हटले आहे -तं विद्यात् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम्।

                        तदा द्रष्टुः स्वरूपे=वस्थानम् ।।३।।
      ज्यावेळी चित्ताच्या सर्व वृत्ती निरोधिल्या जातात तेव्हा द्रष्टा हा त्याचे जे चैतन्य स्वरूप हे योगशास्त्राच्या मते प्रकृतिपासून वेगळेपणा दाखविते. योगाच्या चित्तिवृत्तिनिरोधावस्थेत द्रष्टा हा काही काळ तरी प्रकृती संयोगापासून अलग असतो.
 
                           वृत्तिसारूप्यमितरत्र ।।४।।
      योगाच्या चित्तिवृत्तिनिरोधाहून भिन्न अवस्थेमध्ये द्रष्टा हा चित्ताच्या ज्या वृत्तिरूप अवस्था असतील त्यांच्याशी समरस असतो, एकरूप झाल्यासारखा दिसतो. व्युत्थाने याश्चित्तयस्तदविशिष्टवृ्तिः पुरूषः असे व्युत्थानावस्थेतील पुरूषाचे स्वरूप कथन केले आहे.
                        वृत्तयः पञ्चतय्यः क्लिष्टाक्लिष्टाः  ।।५।।
    वृत्ती पाच आहेत. त्या क्लिष्ट असतात अथवा अक्लिष्ट असतात. वृत्तिची क्लिष्टता अथवा अक्लिष्टता त्यांच्या गुणांवरून व कार्यावरून ठरली जाते. क्लिष्टवृत्ती ह्या क्लेशहेतुक असून कर्माचा ढिगारा सारखा वाढविणा-या असतात. ज्याप्रमाणे शेत सर्वथा धान्या वृद्धी करते त्याप्रमाणे काही वुत्तिंपासून कर्म सारखे वाढते. त्या क्लेशहेतुक वृ्त्ती होत. परंतु जेव्हा ज्ञान वाढवितात, सत्तव-रज-तम गुणांच्या व्यापाराला विरोध करून त्यापासून पुरूषास दूर ठेवतात तेव्हा त्यांना अक्लिष्ट वृत्ती म्हणतात.

  
              प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रास्यमृतयः  ।।६।।
   त्या पाच वृत्ती प्रमाण , विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती ह्या होत.
 
               प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणिनि ।।७।।
       ज्यापासून प्रमाज्ञान होते त्यास म्हणतात.प्रमा म्हणजे रजते इदं रजतमितिज्ञानम् ।प्रमाज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान.जसे असले तसे ज्ञान . हे प्रमाज्ञान यथाभूत वस्तुविषय  असते. जशी वस्तू असेल तसे ते ज्ञान होते. ही प्रमाणे  तीन आहेतः प्रत्यक्ष प्रमाण , अनुमान प्रमाण व आगाम प्रमाण. आगम म्हणजे वेद.

    विपर्ययोमिथ्याज्ञानमतद्रूपप्रतिष्ठितम् ।।८।।
    विपर्यय म्हणजे विपरीत ज्ञान. ह्यास मिथ्या ज्ञान म्हणतात. कारण ह्या ज्ञानाची प्रतिष्ठा जे त्यांचे रूप नाही अशा वस्तुवर झालेली असते .शुक्तिवर हे रजत आहे असे विपरीत ज्ञान होते. ह्याला मिथ्याज्ञान म्हणतात. ह्यासच कोणी अप्रमाज्ञान म्हणतात. अप्रमाज्ञानाची व्याख्या तदभावति तत्प्रकारको=नुभवः अशी आहे व यथा शुक्तिविंद रजतमिति ज्ञानम् हे उदाहरण म्हणून घेतले आहे.
                      शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः ।।९।।
      विकल्प म्हणजे विशेष कल्पना वस्तुशून्य असते. उदाहरणार्थ साखरेची गोडी म्हटली की ती गोडच असते ही विशेष कल्पना  मनात येते .तथापि ,गोड ही वस्तुशून्य आहे. ती वस्तू नाही . इतके असूनही गोडीचे ज्ञान शब्दाने करून देता येते म्हणून गोडीला शब्द ज्ञानानुपाती म्हणता येईल. विकल्प म्हणजे ज्याचे ज्ञान शब्दाने होते पण ते ज्ञान मात्र वस्तुस्वरूप नसते. भाष्यांत चैतन्यं पुरूषस्य स्वरूपम् हे विकल्पाचे उदाहरण दिले आहे. विशेष्याची जी विशेषणे ती सर्व विकल्पाचीच उदाहरणे आहेत. पतञ्ञलीच्या सूत्रानुसार शशशृंग, खपुश्प, वनध्यापुत्र ही विकल्पाची उदाहरणे म्हणून घेता येणार नाहीत. कारण वन्ध्यापुत्र हे पद उच्चारल्याबरोबर शब्दाने  कशाचेही ज्ञान होत नाही तर वस्तुस्वरूपाची  असिध्दता मात्र लक्षात येते. विकल्प यात जर अभावरूप वन्ध्यापुत्राची कल्पना यावी असे वाटत असले तर शब्दानुपाती वस्तुस्वरूपासिद्धो विकल्पः  अशी एक स्वतंत्र व्याख्या करावी लागले. पण पतञ्ञलीला  भावरूप अशी जी विशेषणात्मक वृत्ती तिचाच केवळ निरोध करावयाचा असल्याने  मुद्दाम शब्दज्ञानानुपाती म्हणजे  शब्दावरूनच ज्याचे स्वतंत्र ज्ञान होते पण ते ज्ञान मात्र वस्तुशून्य असते, वस्तुस्वरूप नसते, उदाहरणार्थ  सर्व भाववाचक नामे, त्यालाच  विकल्प म्हटले आहे.
                    अभावप्रत्ययालम्बना वृ्त्तिर्निद्रा ।।१०।।
    निद्रा ही एक वृत्ती आहे की ज्या वृत्तिला आलम्बन म्हणून अभाव प्रत्यय  आहे. तमस्वरूप हेच आलम्बन वृत्तिला असले की वृ्त्ती  तदाकार होते. तमस्वरूप हे अज्ञानमय असल्याने त्या ठिकाणी कशाचेही ज्ञान नसते व म्हणूनच जागे झाल्यावर मी मूढ होतो, मी झोपेत काहीही जाणले नाही असा प्रत्यय येतो. येथे अभाव याचा अर्थ वस्तू नसणे  असा घेतला  तर भूतले घटाभावः या उदाहरणात  जरी भूतलाशी  चक्षुःसन्निकर्ष आहे तरी वृत्ति मात्र घटाभावात्मक आहे व हीसुध्दा निद्रा होईल. पण प्रत्याक्षात  ती निद्रा नाही. म्हणून अभाव म्हणजे तम, अज्ञान, मूढता असा येथे अर्थ आहे.  तदाकार वृ्त्ती होणे ही  अज्ञानाशी एकरूपता हिचा समाधिला अडथळा होतो तो टाळावा असा या सूत्राचा आशय आहे.
                  अनुभूतविषयासंप्रमोषः स्मृतिः ।।११।।
    स्मृती म्हणजे पूर्वी अनुभवलेला जो विषय त्या अनूभूतविषयज्ञानाचा   नाश न होणे . पूर्वीचा अनुभवलेला  विषय  बरोबर  ध्यानी येणे याला स्मृती म्हणतात. संस्कारमात्रजन्यज्ञानं स्मृतिः अशी स्मृतिची व्याख्या तर्कसंग्रहात  आहे. ती देखील वरील सूत्राच्या आशयाची आहे.
            अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः ।।१२।।
      वरील  पाच वृत्ती प्रमाण ,विपर्यय,विकल्प, विद्राव स्मृति या जर कर्माचा ढिगारा वाढवणा-या अतएव क्लिष्ट  असतील तर अभ्यास व वैराग्य (आसक्ती नसणे ) या योगे त्यांचा निरोध करावा.
     
              तत्र स्थितौ यत्नो=भ्यासः ।।१३।।
     द्रष्टा त्याच्या स्वरूपात व्यवस्थित रहावा म्हणून केला जाणारा जो यत्न त्याला अभ्यास अशी संज्ञा आहे.

           स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमिः ।।१४।।
    तो अभ्यास बराच काळ सतत व ब्रह्यचर्य ,तत्त्वज्ञान, विद्या आणि कैवल्यसंपादनावरील विश्वास यांमुळे आपले जे प्रकृतिपासून भिन्न असलेले चेतन स्वरुप  त्याप्रत स्थित  राहातो. चित्तवृत्ती पूर्ण रोखल्या जाऊन द्रष्टा आपले जे  प्रकृतिपासून  भिन्न  असलेले चेतन स्वरूप त्याप्रत  स्थित  राहातो. चित्ताची वृत्तिरूपाने  प्रकट  होणारी अस्थिरता ही  निग्रहास फार कठीण  आहे. अर्जुनाने भगवंतास  प्रश्न केला-
   योगसूत्र समाधिपाद
   चंचलं हि मनः प्रमाथिबलवदृढम् । तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ।।
        यास उत्तर म्हणून भगवंताने अभ्यास व वैराग्य यांवर भर देऊन त्यायोगे चित्तताची स्थिरता सत्तवर होते असे ध्वनित केले आहे. भगवंत सांगतात -असंशयं महाबाहो मनोदुर्निग्रहं चलम् । अभ्यासेन तु कौन्तेय वैरैग्येण च गृह्यते ।।(भ. गी .६.३४). पुन्हा अभ्यासाची महती सांगितली  आहे. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्। अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय ।। (भ.गी. १२.९)
   
             दृष्टानुश्रविकविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यम् ।।१५।।
      दृष्टा म्हणजे इन्द्रियांच्याव्दारे उपभोगलेले ऐहिक विषय (स्त्री,धन, पुत्र, पशु, ऐश्वर्य,इत्यादि ) व श्रुतज्ञानामुळे अभिलाषा उत्पन्न झाली उदा. स्वर्गादिकाविषयी, असे आनुश्रविक विषय. यानाहिशी होऊन चित्त वश झाले आहे व कैवल्याच्या मार्गावर लागले आहे त्या चित्ताच्या भूमिकेस वैराग्य म्हणतात. चित्ताची ऐहिक व पारलौकिक भोग ,तृष्णा जाऊन ते वश होणे यावर भगवंताने गीतेत फार भर दिला आहे. ते सांगतात-
                      कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलाप्रदाम ।
                      क्रियाविशेषबहुलां भोगश्चर्यगतिं प्रति ।।
                      भोगैश्चिर्यप्रसत्कानां तयापह्तचेतसाम् ।
                      व्यवसायात्मिकाबुद्धिः  समाधौ न विधीयते।।
                      त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन।
                      निर्व्दन्व्दो नित्यसत्तस्थो निर्योगक्षोम आत्मवान् ।।
                      श्रुतिविप्रतिपन्ना ते यदास्थास्यति निश्चिला।
                      समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि।।
                                                         (भ, गी. २.५३)
  
   इन्द्रियांच्या वशतेबद्दलदेखील असेच म्हटले आहे.
          
     वशेहि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता।।
     असंयतात्माना  योगोदुष्प्राप इति मे मतिः
    वश्यात्मना तु यतता शक्यो=वाप्तुमुपायतः ।। (भ.गी. ६. ३६)
        
                       तत्परं पुरूषख्यातेर्गुणवैतृष्ण्यम् ।।१६।।
     सूत्र १५ मध्ये विषयगत निर्मोहानामुळे उत्पन्न झालेले जे वैराग्य ते अपर वैराग्य म्हणून सांगितले. या सूत्रात परवैराग्याची व्याख्या केली आहे. ज्ञानाच्या तीव्र  इच्छेमुळे सात्त्विक, राजस व तामस भोगांविषयीची तृष्णा संपुर्ण नाहीशी होणे, तथापि ,पुरूषाची प्रकृतिपासून भिन्नत्व पहाणे ही अभिलाषा मात्र तीव्र होत जाणे यास परवैराग्य म्हणतात. कैवल्यप्राप्तीस  नुसते अपर वैराग्य असून भागत नाही तर कैवल्याचीही इच्छा पाहिजे व ती इच्छा असणे हीच परवैराग्याची खूण आहे.
   
                        विर्तकविचारानन्दास्मितारूपानुगमात् संप्रज्ञातः ।।१७।।
       समाधिचे दोन प्रकार आहेतः सम्प्रज्ञात व अस्प्रज्ञात . या  सूत्रात संप्रज्ञात समाधिचे लक्षण सांगितले आहे. संप्रज्ञात समाधी चार प्रकारची आहे- विर्तकरूपानुगम, विचारानुगम, आनन्दानुगम व अस्मितामुगम. ज्यावेळी एखादी मूर्ती ध्यानाला आलम्बन म्हणून असते व तेथेच चित्त स्थित राहते तेव्हा ती वितर्कानुगम संप्रज्ञात समाधी असते. हे स्थुल आलम्बन आहे व त्यांत पाचही तन्मात्रांचे विचार ध्यावासाठी साहाय्यभूत होतात. त्यांपैकी जेव्हा एकच तन्मात्र विचाररूपात येईल त्यावेळी चित्तस्थिरता ही दुस-या प्रकारची संप्रज्ञात समाधी असते. जेव्हा त्याहून अधिक सूक्ष्मतर अशी आनंदात्मक वृत्ती होऊन राहील  तेव्हा ती तिस-या प्रकारची संप्रज्ञात समाधी व जेव्हा केवळ अहमाकार वृत्तिशी चित्ताची तन्मयता होईल तेव्हा ती चौथ्या प्रकारची संप्रज्ञात समाधी.
                 विरामप्रत्ययाभ्यासपूर्वः संस्कारशेषो=न्यः ।।१८।।
     अभ्यासपूर्वक जेव्हा अहमाकार वृत्ती नाहीशी झाल्याचा प्रत्यय येईल तेव्हा चित्त हे केवळ पूर्वजन्मार्जित संस्कारमय राहते. अर्थात ते    संस्कार पुरूषाला पुन्हा व्युत्थानस्थितीतल्या धर्माधर्माने बाध्य करीत नाहीत. ही असंप्रज्ञात समाधी असते.
    पातञ्ञल योगाची भूमिका सांख्याच्या तत्त्वज्ञानावर उभारलेली असल्याने येथे संस्कारशेष असे जे अन्त्यसमाधिचे वर्णन केले त्याचे विवेचन सांख्य तत्वज्ञानाला धरून या ठिकाणी केल्यास उचित होईल. सूत्र १.५० मध्ये म्हटल्याप्रमाणे अध्यात्मप्रसादापासून एक संस्कार उत्पन्न होतो त्यास तज्जः संस्कार म्हणजे ऋतंभरा प्रज्ञेपासून उत्पन्न झालेला संस्कार असे नाव आहे. या संस्काराचे स्वरूप म्हणजे पुरूष हा प्रकतिपासून अगदी भिन्न आहे हे होय. हा संस्कारसुद्ध जेव्हा लोप पावले तेव्हा पुरूष केवळ स्वरूपाने स्थित राहील व हीच निर्बीज समाधी अथवा पुरूषाची कैवल्यता.
        हा जो तज्ज संस्कार आहे हा असंप्रज्ञात समाधिमध्ये वावरणारे जे पूर्वजन्मार्जित असंख्य संस्कार आहेत त्याचा निरोध करतो. हे जे अन्य संस्कार आहेत ते संस्कार केवळ संप्रज्ञात समाधितील अहमाकार वृत्ती मावळल्यावरच असंप्रज्ञात समाधित भासमान होतात. अर्थात अहमाकार -वृ्त्तीचे संस्कार नाहिसे झाल्यावरच यांचा उदय होत असल्याने मागील सर्व जन्म त्या योग्यास त्या संस्कारामुळे आठवतील व भव म्हणजे संसार याची यथार्थ जाणीव त्यास होईल. ती जाणीव कदाचित् हा संसार (भव) केवळ संस्कारमात्रजन्य आहे याही स्वरूपाची असेल. यावरून असंप्रज्ञात समाधिमध्ये जे संस्कारशेषत्व आहे( संस्काराचे शिल्लक असणे हे स्वरूप आहे) ते धर्माधर्मादिकास कारम नसून केवळ धारण करण्यासाठीच असतात. या विषयी खालील आधार म्हणून घेता येईलः

             सम्यग्ज्ञानाधिगमाद्धर्मादीनामकारणप्राप्तौ ।
             तिष्ठति संस्कारवशाच्चक्रभ्रमिवद्धृतशरीरः ।।

         भवप्रत्ययोविदेहप्रकृतिलयानाम् ।।१९।।
     असंप्रज्ञात समाधिमध्ये जो अहमाकार वृत्तिचा अभाव आहे व केवळ संस्कारशेषत्व आहे त्यामुळे भव म्हणजे संसार याची योग्य जाणीव जे विदेह प्रकृती रूपात आहेत अशांना अर्थात् देवांना सहज होते. हा संसार केवळ पूर्ववासना निर्मित असल्याने त्या  प्रकृतिजन्य  संस्कारापासून ,अलिप्त राहून कैवल्यसुखाची म्हणजेच पुरूषप्रकृतिभिन्नत्व जाणून घेण्याची , अभिलाषा  विदेही म्हणजेच देव  अथवा योगी धरतात.
  
              श्रद्धावीर्यस्मृतिसमाधिप्रज्ञापूर्वक इतरेषाम् ।।२०।।
    इतर योगी हे असंप्रज्ञात समाधित जाऊन संसाराचे संस्कारमय स्वरूप जाण्याची श्रद्धा, तप, स्मृती (आठवण) , समाधी , प्रज्ञा यांची मदत घेतात.
     श्रद्धा म्हणजे पुरूष हा प्रकृतीपासून पूर्णपणे भिन्न आहे या तत्तवावर विश्वास . वार्य म्हणजे पुरूष प्रकृतिहून भिन्न आहे ही जाणीव  करून घेण्यासाठी लागणारे तपाचरण.
     स्मृती म्हणजे अहमाकार (अस्मितानुरूप) जाणीव राहाणे. या जाणीवेचे अर्थातच निराकारण करावयाचे असते. केवळ संस्काराचीच जाणीव असणे ही समाधी व प्रज्ञापूर्वक (-अर्थात बुद्धिला हा सर्व संसार संस्कारमय आहे अशा अर्थाचे ज्ञान होऊन ) या भावाचा प्रत्यय येणे हे सर्व इतर देहधारी योग्यांच्या बाबतीत होते.

   पातञ्ञल योगसूत्र
    समाधिपाद
                  तीव्रसंवेगानामासन्नः ।।२१।।
       तीव्र योग (योग्य जाणण्याची इच्छा, अर्थात असंप्रज्ञात समाधिकडे जाण्याची तीव्र इच्छा ) ज्यांच्याजवळ आहे अशा योग्यांना सत्वर 'अस्मितावृत्तिचा' विसर पडून असंप्रज्ञात समाधिचा लाभ होतो.

                  मृद्रुमध्याधिमात्रत्वात्ततो=पि विशेषः ।।२२।।
     काहींचा हा तीव्र संवेग सौम्य तर काहींचा त्यापेक्षा जरा उत्कट तर काहींचा फारच जलद असतो. असे तीव्र संवेगात देखील विशेष भेद आहेत.
     
             ईश्वरप्रणिधानाव्दा ।।२३।।
       (तीव्र संवेगामुळेच समाधिलाभ होतो असे नसून) ईश्वरास भक्तिपूर्वक (प्रणिधानात) आळविणे असता त्याच्या ध्यानामुळेसुद्धा सत्वर समाधिलाभ होतो.
 
                 क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्टः पुरूषविशेष ईश्वरः ।।२४।।
        या सूत्राचा अर्थ करण्यापूर्वी पुरूषविशेष याचे विवेचन आवश्यक आहे. पुरूषविशेष या शब्दाने 'Personal God,' ही कल्पना मनात येते. सांख्य व योग यांच्या मते Absolute ही कल्पना नाही. Absoulte  या शब्दाने  The ultimate being is one - a simple power  ही कल्पना समजून येते. ही कल्पना सांख्याची अगर योगाची नाही. सांख्य व योग हे बहुपुरूषवादी आहेत. 'बहवाः पुरूषा राजन् सांख्ययोगविचारिणाम्।' असे महाभारतकाराचेही मत आहे. म्हणून पुरूषविशेष अथवा Personal God याची कल्पना खालीलप्रमाणे करता येईल  :
      It is not limitations inherent in human personality that we  imply when we ascribe personality to God, but all the positive attributes that constitute man's superiority to beasts carried to a much highter level and freed from the limitations by which they are in us conditioned; applied to God all such terms must be understood ' sensus eminenotry '(Rashdall- Theory of Good & evil Book III Ch. IV)
            या विवेचनावरून सूत्राचा अर्थ असा की अविद्यादिक क्लेश , कुशल व अकुशल कर्म यांचे फळ मिळणे हा विपाक व त्या फलानुगत वासना मनात असणे हा आशय या सर्वांनी रहित असा जो पुरूषविशेष तोच ईश्वर व हा ईश्वर सदैव मुक्त पूरूष आहे.
             तत्र निरतिशयं सर्वज्ञबीजम् ।।२५।।
     त्या परमेश्वरात पुर्णत्वाने सर्वज्ञत्वाचे बीज आहे. म्हणजेच तोच संपूर्ण जाणू शकतो. 'निरतिशयं नाम यतः परमतिशयवत्ता नास्तीति।' (महाभारत)
            स पूर्वेषामपि गुरूः कालेनानवच्छेदात् ।।२६।।
        गुरूपदवी प्राप्त झालेले पूर्वीचे जे महान ऋषी त्या सर्वांचा देखील तो गुरू आहे कारण त्याचे ठिकाणी अवच्छेदकत्व नाही -कालाने हा बद्ध होऊ शकत नाही -मात्र पूर्वऋषींचाच तो गुरू होता व आता तो गुरू नाही असा भाव नसून तो सर्वदाच गुरू आहे.

                    तस्य वाचकः प्रणवः ।।२७।।
    त्या ईश्वराचा वाचक ओंकार आहे. वाचक म्हणजे बोध करून देणारा .
       
      तज्जपस्तदर्थभावनम् ।।२८।।
          ओंकाराचा जप करताना ईश्वराची भावना करावी. 'भावना नाम पुनःपुनरीश्र्वरचिन्तनम्।'
 
                    ततः प्रत्यक्चेतनाधिगमो~प्यन्तरायाभावश्र्च ।।२९।।
   त्या ओंकाराच्या जपापासून व ईश्वर भावनेमुळे प्रचितीला येणारे असे जे चैतन्य त्याचा अधिगम -साक्षात्कार होऊ लागतो व जे अंतराय (विघ्ने) आहेत ते पूर्णपणे नाहिसे होतात. 

  पातञ्ञल योगसूत्र
        समाधिपाद
    व्यधिस्त्यानसंशयप्रमादालस्याविरतिभ्रान्तिदर्शनालब्ध-
    भुमिकत्वानवस्थितत्वानि चित्तविक्षेपास्ते=न्तरायाः ।।३०।।
          साक्षात्कारामध्ये जी विघ्ने येतात ती वरील सूत्राने सांगतात, चित्तामध्ये विक्षेप उत्पन्न करणारे जे अन्तराय (व्यत्यय) आहेत ते म्हणजे व्याधी ,स्त्यान ,संशय, प्रमाद, आलस्य, अविरति, भ्रान्तिदर्शन, अलब्धभुमिकत्व व अनवस्थितत्व ही होत. शरीरीतील वात, पित्त, कफ अथवा खाल्लेले, प्यालेले विविध रस यांत विषमता उत्पन्न होणे, इंद्रियांना दुखापत पोहचणे यास व्याधी म्हणतात. अकर्मण्यता(कर्म करण्याची अयोग्यता) चित्तात असणे यास स्त्यान म्हणतात. समाधिची सिद्धता खरी अथवा खोटी आहे असे उभयकोटिक विचार मनात येणे यास संशय म्हणतात. समाधिस पोहचण्यासाठी जो मार्ग निश्चित केला आहे त्याचे योग्य पालन न होणे यास प्रमाद म्हणतात. अनियमितपणामुळे शरीरात शैथिल्य येणे यास आळस म्हणतात. आळस म्हणजे 'जाडयामुळे शरीराची व चित्ताची समाधिमार्गाकडे प्रवृत्ति न होणे'  असे विवेचन भाष्यांत आहे.
          समाधिमार्गाचा अवलंब करीत असता विषय संप्रयोगामुळे चित्तात विषयासंबंधी  तृष्णा उत्पन्न होऊन चित्तप्रवाह सारखा त्या विषयाकडे जाणे यास अविरति म्हणतात. विरति म्हणजे चित्ताची विषयाकडे जाण्यापासून स्तब्धता. भ्रान्तिदर्शन म्हणजे विपर्ययज्ञान, जशी वस्तू आहे तसे ज्ञान न होता विपरीत ज्ञान होणे.
         अलब्धभूमिकत्व म्हणजे समाधिला पोहचण्यासाठी ज्या भिन्न भिन्न भूमिका आहेत त्यांचा लाभ न होणे. जरी एखाद्या भूमिकेचा अभ्यासाने लाभ झाला तरी चित्त त्या ठिकाणी अवस्थित (स्थिर) न राहणे, हे चित्ताचे अनवस्थित्व. वरील अडथळ्यांमुळे चित्तात विक्षेप उत्पन्न होतात.
         
                   दुःख दौमर्नस्याङ्गमेजयत्वश्वासविक्षेपसहभुवः ।।३१।।
      सहभूः म्हणजे natural, innate, त्याच क्षणाला उत्पन्न होणारे. या ठिकाणी सहभुवः याचा अर्थ सहचारी असा आहे. वरील ३० व्या सूत्रात जे अन्तराय (अडथळे) सांगितले आहेत त्यांचेच सहचारी दुःख, दौर्मनस्य, अंगमेजयत्व, श्वास व प्रश्वास हे आहेत. दुःखे तीन प्रकारची आहेतः आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक.
     इच्छापूर्ती न झाल्याने (इच्छेचा विघात झाल्याने) जो चित्ताचा क्षोभ होतो त्यास दौर्मनस्य म्हणतात. यालाच क्रोध असे नाव आहे. 'कामात्क्रोधोभिजायते', 'कामात्कुतश्चित् प्रतिहतात् क्रोध~भिजायते', असे वर्णन भ. गीतेत आहे.
 (२.६२) अंगमेजयत्व म्हणजे अंगास कंप सुटणे. श्वास म्हणजे बाहेरील वायु आत घेणे व प्रश्वास म्हणजे आत घेतलेला वायु बाहेर टाकणे. ज्यांचे चित्त स्थिर झाले आहे त्यांच्या ठिकाणी वरील अन्तराय सहचारी उत्पन्न होत नाहीत.

                 तत्प्रतिषेधार्थमेकतत्त्वाभ्यासः ।।३२।।
            तीस व एकतीस सूत्र मुळून जे अन्तराय व त्यांचे सहचारी यांचे वर्णन केले त्यांचा पूर्ण प्रतिरोध (निरोध) करण्यासाठी एकतत्त्वाचा अभ्यास करावा. अर्थात् , कोणत्या तरी एका वस्तुवर चित्त स्थिर करण्याचा अभ्यास करावा.

                  मैत्रीकरूणामुदितोपेक्षाणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनम् ।।३३।।
            जे प्राणी सुख-सम्पन्न आहेत त्यांच्याविषयी मैत्रीची भावना ठेवणे, जे प्राणी दुःखी आहेत त्यांच्याबद्दल करूणा बाळगणे, त्यांची कीव करणे, जे प्राणी पुण्यवान् आहेत त्यांच्याबद्दल आनंद प्रकट करणे , अशा भावनांनी चित्तात प्रसन्नता उत्पन्न होऊन ते चित्त सहज एककोन्द्री होऊन एकाग्रतेला पोहचते.
                           रागव्देषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् ।
                          आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ।।
                           प्रसादे सर्वदुःखांना हानिरस्योपजायते।
                          प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ।।
                                                       (भ.गी. २.६४. ६५)
  
                प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य ।।३४।।
    चित्त प्रसन्न होऊन एकाग्र होण्यासाठी जे अन्य उपाय सुचविले जातात त्यांचा 'वा' (अथवा) या पदाने निर्देश केला जातो. प्राणाचे प्रच्छर्दन व विधारण करण्यासाठी देखील चित्त प्रसन्न होऊन एकाग्र होते.
            छातीत व नासिकापुटात घेतलेला जो प्राण त्याचे अतिशय प्रयत्नाने हळूहळू बाहेर बमन करणे धीमेपणाने श्वास बाहेर सोडणे यास प्रच्छर्दन म्हणतात व एकदा श्वासबाहेर सोडला की परत एकदम आत न घेता तसाच बाहेर रोखून धरणे यास विधारण  म्हणतात. या विधारणास कोणी बाह्य कुम्भक म्हणतात. यामुळेही चित्त प्रसन्न होते.

                    विषयवती वा प्रवृत्तिरूपन्ना मनसः स्थितिनिबन्धनी ।।३५।।
    मनसः स्थितिनिबन्धी= मनाच्या स्थितीला बांधणारी
    विषय समोर नसताना जी विषयासंबंधी प्रवृत्ती उत्पन्न होते त्या अभिलाषेतच मन स्थिर होऊन राहणे यानेदेखील चित्ताची एकाग्रता होते. नासिकेचा विषय वास आहे. विषयरहित दिव्य गन्धाची संवेदना उत्पन्न झाली तर त्या कल्पनेत देखील चित्ताची एकाग्रता होईल. जसे घ्राणेन्द्रियाचे तसेच इतर इंद्रियांचदेखील आहे.

                       विशोका वा ज्योतिष्मती ।।३६।।
       ह्दय हे कमळाच्या आकाराचे  आहे. त्यात एक प्रकारचा सात्त्विक प्रकाश आहे. तो 'ज्योतिष्मती' या पदाने सूत्रात निर्दिष्ट आहे. ती ज्योत रजोगुणरहित म्हणून 'विशोका' या पदाने संबोधिली आहे.  त्या सात्त्विक प्रकाशावर चित्त स्थिर केले असता चितैकाग्रता लवकर होते. या सूत्राचा अर्थ असा ,'ह्त्पद्मसंपुटमध्ये प्रशान्तकल्लोलक्षिरोदधिप्रख्यं चित्तसत्तवं भावयतः प्रज्ञालोकात्सर्ववृत्तिपरिक्षये चेतसः स्थैर्यमुत्पद्यते।'  (भोजवृत्ती)

                       विरागविषयं वा चित्तम् ।।३७।।
     ज्या चित्तातून अभिलाषा संपूर्ण गेली आहे असे चित्त ध्यानासाठी विषय होऊ शकते. वीतरागः परित्यक्तविषयाभिलाषः; तस्य यच्चित्तं पुरिह्तक्लेशं तदालम्बनीकृतं चेतसः स्थितिर्हेतुर्भवति।' (भोजवृत्ती)

                                    स्वप्ननिद्राज्ञानालम्बनं वा ।।३८।।
     स्वप्नज्ञान अथवा निद्राज्ञान हे देखील ध्यानास आलम्बन म्हणून घेतले असता चित्त स्थिर होते.
     जर पहाटे सुंदर स्वप्न पडले व तेच स्वप्न ज्ञान-ध्यानासाठी आलम्बन घेतले तर चित्त लवकर स्थित होते. वाचस्पति म्हणतात, 'यदा खल्वयं स्वप्ने मनोहरां भगवतो महेश्वरस्य प्रतिमामाराधयन्नेव प्रबुद्धः प्रसन्नमनस्तदा तामेव स्वप्नज्ञानालम्बनीभूतामनुचिन्तयतस्तस्य तदेकाकारमनसस्तत्रैव चित्तं स्थितिपदं लभते।'
      उत्तम झोप आली असता मी सुखाने झोपलो होतो या ज्ञानावर देखील मन त्वरित एकाकार होते. 'निद्राचेह सात्त्विकी  ग्रहीतव्या यस्याः प्रबुद्धस्य सुखमहस्वाप्समिति प्रत्यवमर्शो भवति एकाग्रं हि तस्यां मनो भवति।'
        
                      यथाभिमतध्यानाव्दा ।।३९।।
         ज्या वस्तू अगर विषयावर त्वरित ध्यान लागले त्याचे ध्यान करावे . एकदा चित्ताला एकाकार होण्याची सवय लागली की ते वाटेल ते आलम्बन सहज ध्यानासाठी घेऊ शकते. 'यदेवाभिमतं तदेव ध्यायेत् तत्र लब्धस्थितिकमन्यत्रापि स्थितिपदं लभत इति।'
  
·                                 परमाणु परममहत्त्वान्तो~स्य वशीकारः ।।४०।।
·                          एकदा चित्ताला कोणतेही आलम्बन घेऊन एकाग्र होण्याची सवय झाली की सूक्ष्मात सूक्ष्म जो परमाणू तोसुद्धा सहज ध्यानाचा विषय होतो व महताहून महत् असे जे परम तेही ध्यानाला आलम्बन होऊ शकते. उभय कोटीत निर्विघ्नपणे ध्यान करता येणे  याला वशीकरण संज्ञा आहे.
·                     
        क्षीणवृत्तेरभिजातस्येव मणेर्ग्रहीतृग्रहणग्राह्येषु
             तत्स्थतदञ्ञनता समाप्तिः ।।४१।।
       ज्या चित्ताच्या वृत्ती क्षीण झाल्या आहेत अशा चित्तामध्ये ग्रहीतृ (ग्रहण करणारा पुरुष) ग्रहण (इंद्रीये) व ग्राह्य (विषय) यांची आत्यंतिक तन्मयता (तदञ्जनता-एकरूपता) होते, त्याला समाप्ति म्हणतात. याला अभिजात (तेजेस्वी) मण्याचा द्दष्टान्त दिला आहे. एखादा तेजेस्वी मणी स्फटिकाच्या आश्रय रूपाच्या आकारानेच भासमान होतो 'यथा स्फटिक उपाश्रयभेदात्तत्तद्रूपोपरक्त उपाश्रययरूपाकारेण निर्भासते।' त्याप्रमाणे ग्रहण करणारा जो पुरूष त्याची ग्राह्य आलम्बलनाशी एकरूपता होते,  'तथा ग्राह्यालम्बनोपरक्तं चित्तं ग्राह्यसमापन्नं ग्राह्यस्वरूपाकारेण निर्भासते।'
        तदञ्जनतासमापत्तिः म्हणजे एकोपा, जुळणी  (ग्राह्यारूपाचे होणे).  तदज्जनता= त्या आकाराचे होणे (तदाकारापत्तिः) तत्स्थदञ्ञनता तेषु स्थितस्य तदाकारापत्तिः = ग्राह्याप्रत स्थिर झाल्यामुळे त्या आकाराप्रत प्राप्त होणे .
        वरील ४१ व्या सूत्रात सांगितलेली समाप्ति दोन प्रकारची आहे. एक सवितर्का समाप्ति व दुसरी निर्वितर्का समापत्ति. ४२ व्या सूत्राने पहिल्या समापत्तिचे कथन करतात.
   
         तत्र शब्दार्थज्ञानविकल्पैः संकीर्णा सवितर्का समापत्तिः ।।४२।।
     संकीर्णा =व्यामिश्रा (मिश्रित). ज्या चित्ताच्या ग्राह्याकाराच्या जुळणीत केवळ शब्द, त्याचा अर्थ व त्या अर्थाचे ज्ञान यांचे मिश्रण कायम राहाते त्यास सवितर्का समापत्ति म्हणतात. स=सह, वि=विशेषव तर्क=कल्पना,कोटी सवितर्का समापत्ति म्हणजे जी जुळणी शब्द , अर्थ व ज्ञान या विशेष तर्कासमवेत असते अशी . या ठिकाणी ग

भासमान 
  योगसूत्र समाधिपाद
   ४२
   या ठिकाणी ग्रहीतृ, ग्रहण व ग्राह्य ही त्रिपुटी  कायम नसून शब्द ,अर्थ व ज्ञान ही ग्राह्य वस्तुचीच त्रिपुटी असते. 'स्फोटरूपो शब्दः। अर्थो जात्यादि । ज्ञानं वस्तुस्वरूपाकारा सत्त्वप्रधानबुद्धिवृत्तिः। एतत् स्वरूपो विकल्पः ।'

      स्मृतिपरिशुद्धौ स्वरूपशून्येवार्थमात्रनिर्भासा निर्वितर्का ।।४३।।
            परिशुद्धिः = अपगम; टाकून देणे
      ज्या प्रज्ञेने शब्द ,अर्थ  व ज्ञान ही त्रिपुटी संपूर्ण टाकली आहे अशा प्रज्ञेने स्वतःचे ग्रहण करण्याचे स्वरूप टाकून देऊन ग्राह्यपदार्थमात्राचे जे स्वरूप आहे ती स्वरूपता प्राप्त केली आहे, असे जेव्हा स्वरूप होईल तेव्हा त्या स्थितीस निर्वितर्का समापत्ति असे म्हणतात.
       'प्रज्ञा स्वामिव प्रज्ञास्वरूपं ग्रहणात्मकं त्यक्त्वा पदार्थमात्रस्वरूपाग्राह्य-स्वरूपान्नेव भवति तदा निर्वितर्का समापत्तिः।'
   प्रज्ञा ही ग्राह्याशी एकीभूत झाल्याने तिचे मूळचे ग्रहण करण्याचे स्वरूप जणू नाहीसे झाल्यासारखे दिसते. म्हणून या प्रज्ञेसाठी स्वरूपशून्यइव असे पद वापरले आहे. केवळ ग्राह्यकाराने भासते म्हणून 'अर्थमात्रनिर्भासा ' हे पद वापरले आहे.
योगसूत्र समाधिपाद

                      एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता।।४४।।
         सवितर्का निर्वितर्का समापत्तिच्या व्याख्यानाने 'सविचारा सूक्ष्मविषया समापत्ति' व 'निर्विचारा सूक्ष्म विषयासमापत्ति'चेही विवेचन झाले असे समजावे .हे विवेचन असे- सूक्ष्म विषय म्हणजे तन्मात्र. ४२ व ४३ सूत्रात महाभूत हे बुद्धिचे आलम्बन (ग्राह्य विषय) होते. पण जेव्हा सूक्ष्म स्वरूपात असलेले तन्मात्र बुद्धीचे जर शब्द , अर्थ व ज्ञान या विकल्पाने सहित (युक्त) अशी ग्राह्यकार झाली व विशिष्ट देशकाल जाणीव याने परिमित असली (अविच्छिन्न) तर तिला 'सविचारा सूक्ष्मविषयासमापत्ति' व देशकालधर्मरहित, शब्द, अर्थ, ज्ञान या विकल्पाचे भान न होता केवळ सूक्ष्म विषयाच्या स्वरुपाची असेल तर तिला 'निर्विचारासूक्ष्म विषया-समापत्ति' असे म्हणावे. या सूत्रावरील भोजवृत्ती अशी-
       सूक्ष्म विषया-सूक्ष्म तन्मात्रेन्द्रियादि विषयो यस्याः सा।
    शब्दार्थविषयत्वेन शब्दार्थविकल्पसहितत्वेन देशकालधर्मद्यवच्छिन्नः
    सूक्ष्मो=र्थः प्रतिभाति यस्यां सा सविचारा। देशकालधर्मादिरहितो धर्मिमात्रतया सूक्ष्मोर्थस्तन्तमात्रेन्द्रियरूपः प्रतिभाति यस्यां सा निर्विचारा।
    सूक्ष्मविषय यांचा सांख्यांचे पञ्चतन्मात्र असा अर्थ करावा.

          सूक्ष्म विषयत्वं चालिङ्गपर्यवसानम् ।।४५।।
     बुद्धी सूक्ष्म, अधिक सूक्ष्म अशी ग्राह्याकार होऊ लागली की ती पञ्चतन्मात्रांचे आलम्बन सोडून त्याहून सूक्ष्मतर असा जो अहंकार तोच  ग्राह्याला आलंबन म्हणून घेते. एकदा अहंकाराला आलंबन म्हणून घेण्याची सवय झाली की त्याहून अधिक सूक्ष्म जे मह्त, तिथे चित्त पोहोचते. मह्दाहून अतिसूक्ष्म अशी जी प्रकृती त्या प्रकृतीग्राह्यापर्यन्त एकदा बुद्धी गेली की त्या पलीकडे  ग्राह्य  काही नाही . म्हणून प्रकृती या सूक्ष्म विषयाला 'अलिंगपर्यवसायित्व ' आहे . हे जे प्रकृतिलाच सूक्ष्म विषय ग्राह्यासाठी ( अर्थात् आलम्बनासाठी) ग्रहण करणे आहे याचे पर्यवसान याहून अधिक सूक्ष्म ग्राह्यालंबनात नाही कारण प्रकृतिहून  अधिक सूक्ष्म काही नाही. लिंगपर्यवसानम् म्हणजे एखाद्या विषयाचे  (अर्थात् कार्याचे) आपल्या कारणात लीन होणे. महाभूते पञ्चतन्मात्रंत लीन होतात. मह्त हे पञ्चतन्मात्र अहंकारात लीन होतात. अहंकार महत् मध्ये लीन होतो. मह्त हे प्रकृतिमध्ये लीन होते. म्हणून महत् पर्यन्त सर्वाना लिङगपर्यवसायित्व आहे. पण प्रकृतिला लिंगपर्यवसायित्व नाही.  ती अतिसूक्ष्म  आहे. म्हणून सूत्रांत ,सूक्ष्मात सूक्ष्म जी पकृती , तेथेपर्यन्त  बुद्धी जाते असे म्हटले आहे. ती प्रकृती इतर कशातही (अधिक सूक्ष्मात) लीन होत नाही, कारण तीच सर्वांचे मूळ आहे म्हणून तिला अलिंगपर्यवसायित्व आहे यावर कोणी अशी शंका घेईल  की पुरूष हा तर प्रकृतिहून अधिक सूक्ष्म आहे. त्यात पर्यवसान न पावता प्रकृतिपर्यन्तच ग्राह्याकारता का स्वीकारली?
         तर याचे उत्तर असे की , प्रकृती जशी  जगत् प्रपंचात अनुस्यूत (अन्वयिकारण) आहे तसा पुरूष अनिस्यूत नाही. तो ग्राहक अत एव केवळ हेतू आहे. म्हणून प्रकृतीमध्येच सूक्ष्मपणा निरकिशयाने आहे व पिकृती हा जो ग्राह्याचा विषय आहे त्याला  अलिंगपर्यवसान म्हटले कारण प्रकृती अन्य कशातही लय पावत नाही.

                ता एव सबीजः समाधिः ।।४६।।
    ता म्हणजे चार समापत्ति-सवितर्क, निर्वितर्क, सविचार व निर्विचार. या आलम्बनसहित असतात. एकदा चित्त प्रकृतिलाच ग्राह्यालंबनासाठी घेऊन तदाकारतेला प्राप्त झाले की, त्याच चित्ताच्या स्थितीला सबीज समाधी म्हणतात. सबीज म्हणण्याचे कारण प्रकृती ही जगत् व्यापाराला कारण आहे. या सबीज समाधिपासून निर्बीज समाधी साधावयाची आहे हे अभ्यासू व्यक्तींनी लक्षात ठेवावे म्हणून हे सूत्र उद्धृत केले आहे.

               निर्विचार वैशारद्ये=ध्यात्मप्रसादः ।।४७।।
    वैशारद्य याचा अर्थ निर्मलता, प्रवीणता. निर्विचाराची निर्मलता प्राप्त झाली की कोणत्याही सूक्ष्म विचारापासून मन पूर्ण अलिप्त राहिल व तोच त्या चित्ताचा अध्यात्मप्रसाद. 'निर्विचारा सूक्ष्मविषया समाप्ति' चे पर्यवसान अलिंगापर्यन्त होते. हा विषय सूत्र ४३-४५ मध्ये आला आहे. त्यात सांगितलेली निर्वितर्कता ही मुख्य  असून ती जेव्हा संपूर्ण क्लेश-वासनारहित होईल तेव्हा जी चित्ताची शुद्धता त्यालाच अध्यात्मप्रसाद म्हणतात.

                    ऋतंभरा तत्र प्रज्ञा ।।४८।।
    चित्ताच्या अध्यात्मप्रसादावस्थेत प्रज्ञा ही ऋताने (सत्याने) भरलेली असते.  तत्र म्हणजे अध्यात्मप्रसादाचा लाभ झाल्यावर. त्यावेळी जगदस्तित्वाबद्दल, प्रधान-पुरूषाबद्दल, व्यक्ताव्यक्ताबद्दल सत्य ज्ञान होते, प्रधान हा शब्द सांख्याशास्त्रात प्रकृती या अर्थाने वापरतात. अध्याय२ सूत्र पाच मध्ये अविद्येचे लक्षण दिले आहे. तसे अविद्यात्मक ज्ञान प्रज्ञेला नसते. भोजदेव वृत्तीच्या या सूत्रावरचे स्पष्टीकरण असे - 'ऋतं सत्यं बिभर्ति कदाचिदिप न विपर्ययेणाच्छाद्यते सार्तंभरा प्रज्ञा तास्मिन् सति भवतीत्यर्थः ।
      या सूत्रावर अशी शंका आहे की, श्रुतज्ञानाने (आगम प्रमाणाने) आणि अनुमान प्रमाणाने सत्याविषयी ज्ञान होऊनदेखील प्रज्ञा ही ऋतंभरा, (सत्य जाणणारी) होतेच. तशी जर ती होणार  नाही तर श्रुत व अनुमान प्रमाण याला काहीच अर्थ राहणार नाही. असे असता निर्विचार वैशारद्यावस्थेतच प्रज्ञा ऋतंभरा, सत्य -यथार्थ -जाणणारी होते असे  का म्हटले? यावर ४९ व्या सूत्राने उत्तर देतात-
  
              श्रुतानुमानप्रज्ञाभ्यां सामान्यविषया विशेषार्थत्वात् ।।४९।।
      श्रुतज्ञान अथवा अनुमान यामुळे प्रज्ञेला पुरूष-प्रधान ,व्याक्तव्यक्त,जडाजड यांचे सामान्य ज्ञान होते. विशेष ज्ञान म्हणजे स्फुटरूपाने होणारे ज्ञान अर्थात् प्रत्यक्ष भासमान ज्ञान. चित्ताच्या निर्विचारवस्थेत जेव्हा प्रज्ञा केवळ ऋताने भारली जाते तेव्हाच विशेष ज्ञान होते.
      श्रुतानुमानाभ्यां या जायते प्रज्ञा सा सामान्य विषया। इयं पुनर्निविचारवैशारद्यसमुद्भवा प्रज्ञा ताभ्यां विलक्षणा। विशेषविषयत्वात्।
      
                   तज्जः संस्कारो=न्यसंस्कार प्रतिबन्धी ।।५० ।।
    अध्यात्मप्रसादामुळे प्रज्ञा जेव्हा ऋतंभरा होते त्यावेळी पुरूषप्रकती भिन्नत्वाविषयी, जडाजडाविषयी, जीव  आणि जगत् संस्कार व वासना यांनी बद्ध आहेत याविषयी जो एक कायमचा जगत् तिटका-याचा संस्कार होतो तो संस्कार अन्य वासनारूपी संस्काराला प्रतिबंध करतो. अर्थात् जीवाला समाधिमध्ये  जगताच्या जडत्वाविषयी होणारा संस्कार अगर 'पुरूष प्रकृतिहून भिन्न आहे.'  अशा स्वरुपाचा होणारा संस्कार अन्य वासनारूपी संस्कारामुळे पराभूत होत नाही. समाधिमध्येसुद्धा काही व्युत्थानाला नेणारे  वासनामय संस्कार असतात. त्या संस्कार म्हणजे  अध्यात्मप्रसादामुळे  जी प्रज्ञा  ऋतंभरा झाली  आहे,  अर्थात् सत्याने भारली गेली आहे त्या प्रज्ञेपासून होणारा जगताच्या जडत्वाविषयी संस्कार . अन्य संस्कार म्हणजे वासनामय संस्कार.

               तस्यापि निरोधे सर्वनिरोधान्निर्बीजः समाधिः ।।५१।।
       ४६व्या सूत्रात जी  सबीज समाधी सांगितली तिचाही निरोध केला असता, म्हणजे जो एक शेवटचा संस्कार राहातो की ज्यांत 'प्रकृती पुरूष अत्यन्त भिन्न आहेत या स्वरूपाची जाणीव होते', त्या संस्काराचाही निरोध केला असता निर्बीज समाधी प्राप्त  होते.
          चित्ताची वृत्ती अन्त्यन्त सूक्ष्म अशा प्रकृतिशी तदाकार होते. या सूक्ष्म आलंबनाचा अलिंगपर्यवसायित्व आहे म्हणजे प्रकृती कशातही  लीन पावत नाही, कारण तीच सर्वांचे  मूळ कारण  आहे. चित्तवृत्ती ही प्रकृतिच्या आकारास प्राप्त झाली की ती निर्विकार अशी  जी सूक्ष्म विषयाची जाणीव (शब्द, अर्थ व तज्जन्य ज्ञान या विकल्पाने रहित अशी जी जाणीव) त्या समापत्तिप्रत प्राप्त होते. त्या अवस्थेत जगताकडे खेचणारे असे व्युत्थानरूपी वासनामय कोणतेच संस्कार राहत नाही  कारण या सर्व वासनामय संस्काराचा एका संस्काराने प्रतिबंध होतो. व तो संस्कार म्हणजे 'प्रकृती पुरूषाहून भिन्न आहे' ही जाणीव. सर्वांत शेवटी हाही संस्कार नाहीसा होऊन अध्यात्मप्रसादामुळे चित्तवृत्तींचा संपूर्ण लय होऊन केवळ पुरूषाकार स्वरूपनिष्ठ शुद्ध असे राहाते व हीच निर्बीज समाधी.
     येथे पातज्जल योगसूत्राचा प्रथमाध्यास समाप्त झाला. 
 -----------------------------------------------------------------------














 







             
    





















   
      

कोई टिप्पणी नहीं: