कर्नाटकात उडुपी जिल्ह्यात असलेल्या श्रीकृष्ण मठात ही कथा नेहमी सांगितली जाते. असं समजलं जातं की या मठाची स्थापना उडुपीच्या सम्राटाद्वारा झाली आणि नंतर मग श्री. माधवाचार्यांनी ती परंपरा पुढे वृद्धींगत केली.
महाभारत हे पहिलं विश्वयुद्ध आणि त्यात पृथ्वीवरच्या सर्व राज्यांनी सहभाग घेतलेला होता...कोणी कौरवांकडून तर कोणी पांडवांकडून...
आपल्याला हे ठाऊक आहेच की केवळ श्रीबलराम आणि रुक्मी या दोघाच नरेशांनी यात भाग घेतला नव्हता. पण सध्या कर्नाटकात असलेल्या 'उडुपी' राज्याच्या नरेशानंही या युद्धात भाग घेतला नव्हता. जेंव्हा उडुपी राजा आपल्या सैन्यासह कुरुक्षेत्रावर पोहोचले तेंव्हा कौरव आणि पांडव दोघांनीही त्यांना आपापल्या बाजूला सामिल करण्याचा प्रयत्न केला.
पण अत्यंत दूरदर्शी उडुपीच्या राजानं श्रीकृष्णांना विचारलं "हे माधवा, या दोन्हीही बाजू युद्धासाठी जेंव्हा सज्ज होतील तेंव्हा त्यांच्या या विशाल सेनांच्या भोजनाचा प्रबंध कसा होईल? हे वासुदेवा, या युद्धात भाग घेण्याची माझी इच्छा नाहीये. पण जर आपण अनुमती दिलीत तर माझ्या संपूर्ण सेनेच्या सहाय्यानं इथे उपस्थित असलेल्या या विशाल सेनांच्या भोजनाचा मी प्रबंध करु शकतो."
त्यावर श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न स्वरात म्हणाले, "सागरासारख्या या विशाल सेनांच्या भोजनाचा प्रबंध करणे जे केवळ तुम्ही आणि भीमसेनच करु शकतात...अन्य कोणीही नाही. पण भीम तर या युद्धातून अंग काढून घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हीच या विशाल सेनांच्या भोजनाचा प्रबंध करावा."
उडुपी नरेशाचा भोजन प्रबंध एवढा कुशल होता की युद्धाच्या प्रारंभापासून अखेरपर्यंत अन्नाचं एक शीतही वाया गेलं नाही. जसं-जसं युद्ध होत गेलं तसं-तसं योद्ध्यांची संख्या कमी कमी होत गेली. सगळ्यांनाच याचं अत्यंत आश्चर्य वाटत होतं की उडुपी नरेश केवळ उपस्थित सेनेपुरतंच अन्न कसं काय बनवून घेऊ शकतात. आज भोजनाला कितीजण उपस्थित असतील हे त्यांना कळतं तरी कसं? आजच्या युद्धात किती योद्धे मृत्युमुखी पडणार आहेत हे त्यांना समजतं तरी कसं आणि त्यानुसार भोजनाचा प्रबंध कसा काय करता येतो?
युद्ध समाप्तीनंतर राज्याभिषेकाच्या दिवशी युधिष्ठिरानं न रहावून त्याबद्दल उडुपी नरेशांना विचारलंच, "हे उडुपी महाराज, या युद्धात विजय मिळवल्याबद्दल आमची सर्वत्र प्रशंसा होते आहे. पण आपणही तेवढ्याच प्रशंसेसाठी पात्र आहात. आपण एवढ्या विशाल सेनांच्या भोजनाचा प्रबंध केला परंतु अन्नाचा एक कणही यात व्यर्थ गेला नाही. आपल्या या कुशलतेचं रहस्य मला जाणून घ्यायचंय."
यावर हसतच उडुपी नरेशांनी उत्तर दिलं, "सम्राट, या युद्धात आपल्याला मिळालेल्या विजयाचं श्रेय आपण कोणाला द्याल?"
यावर युधिष्ठिर उत्तरले, "अर्थात्, श्रीकृष्ण... त्यांच्या व्यतिरिक्त हे श्रेय अन्य कोणाला कसे द्यावे?ते नसते तर कौरव सेनेला हरवणं असंभवच होतं."
त्यावर उडुपी नरेश म्हणाले, "हे महाराज, भोजन प्रबंध आपल्याला माझी कुशलता वाटते आहे,पण खरंतर हा श्रीकृष्णप्रतापच आहे." ते ऐकून सर्वच उपस्थितांना आश्चर्य वाटलं.
उडुपी नरेशांनी रहस्य उलगडताना सांगितलं, "हे महाराज, युद्धकाळात दर रात्री श्रीकृष्ण भुईमुगाच्या शेंगा खात असत. त्यांच्या शिबिरात मी दररोज भुईमुगाच्या शेंगा मोजून ठेवायचो आणि त्यांनी किती शेंगा खाल्ल्या हेदेखिल मी पुन्हा मोजून ठेवायचो. भुईमुगाच्या जेवढ्या शेंगा ते खायचे त्याच्या १००० पट सैनिक दुस-या दिवशीच्या युद्धात मृत्युमुखी पडत. उदा. जर त्यांनी ५० शेंगा खाल्ल्या तर मला समजायचं की दुस-या दिवशीच्या युद्धात ५०००० योद्धा मारले जाणार आहेत. आणि मग त्यानुसारच मी भोजन कमी अधिक बनवत असे. आणि याच कारणामुळे कधीही भोजन व्यर्थ गेलं नाही." श्रीकृष्णाचा हा चमत्कार ऐकून सर्वजण नतमस्तक झाले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें