गुरुवार, 16 फ़रवरी 2017

योगसूत्र समाधिपाद सूत्र 1-51

योगसूत्र समाधिपाद
 Author -- Dr Balram Sadashiv Agnihotri
Typed by Ashwini -- To proof read
 
  अथ योगानुशासनम् ।।१।।
      आता योगशास्त्राचे विवेचन केले जाते. अथ शब्द मंगलवाचक आहे. योग म्हणजे मोक्ष मिळविण्याचे साधन, अनुशासन-परंपरेला धरून विषयाचे विवेचन.

                          योगाश्चित्तवृत्तिनिरोधः ।।२।।
   योग याचा अर्थ चित्ताच्या वृत्तींचा सर्वस्वी निरोध. भगवग्दीतेत म्हटले आहे -तं विद्यात् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम्।

                        तदा द्रष्टुः स्वरूपे=वस्थानम् ।।३।।
      ज्यावेळी चित्ताच्या सर्व वृत्ती निरोधिल्या जातात तेव्हा द्रष्टा हा त्याचे जे चैतन्य स्वरूप हे योगशास्त्राच्या मते प्रकृतिपासून वेगळेपणा दाखविते. योगाच्या चित्तिवृत्तिनिरोधावस्थेत द्रष्टा हा काही काळ तरी प्रकृती संयोगापासून अलग असतो.
 
                           वृत्तिसारूप्यमितरत्र ।।४।।
      योगाच्या चित्तिवृत्तिनिरोधाहून भिन्न अवस्थेमध्ये द्रष्टा हा चित्ताच्या ज्या वृत्तिरूप अवस्था असतील त्यांच्याशी समरस असतो, एकरूप झाल्यासारखा दिसतो. व्युत्थाने याश्चित्तयस्तदविशिष्टवृ्तिः पुरूषः असे व्युत्थानावस्थेतील पुरूषाचे स्वरूप कथन केले आहे.
                        वृत्तयः पञ्चतय्यः क्लिष्टाक्लिष्टाः  ।।५।।
    वृत्ती पाच आहेत. त्या क्लिष्ट असतात अथवा अक्लिष्ट असतात. वृत्तिची क्लिष्टता अथवा अक्लिष्टता त्यांच्या गुणांवरून व कार्यावरून ठरली जाते. क्लिष्टवृत्ती ह्या क्लेशहेतुक असून कर्माचा ढिगारा सारखा वाढविणा-या असतात. ज्याप्रमाणे शेत सर्वथा धान्या वृद्धी करते त्याप्रमाणे काही वुत्तिंपासून कर्म सारखे वाढते. त्या क्लेशहेतुक वृ्त्ती होत. परंतु जेव्हा ज्ञान वाढवितात, सत्तव-रज-तम गुणांच्या व्यापाराला विरोध करून त्यापासून पुरूषास दूर ठेवतात तेव्हा त्यांना अक्लिष्ट वृत्ती म्हणतात.

  
              प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रास्यमृतयः  ।।६।।
   त्या पाच वृत्ती प्रमाण , विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती ह्या होत.
 
               प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणिनि ।।७।।
       ज्यापासून प्रमाज्ञान होते त्यास म्हणतात.प्रमा म्हणजे रजते इदं रजतमितिज्ञानम् ।प्रमाज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान.जसे असले तसे ज्ञान . हे प्रमाज्ञान यथाभूत वस्तुविषय  असते. जशी वस्तू असेल तसे ते ज्ञान होते. ही प्रमाणे  तीन आहेतः प्रत्यक्ष प्रमाण , अनुमान प्रमाण व आगाम प्रमाण. आगम म्हणजे वेद.

    विपर्ययोमिथ्याज्ञानमतद्रूपप्रतिष्ठितम् ।।८।।
    विपर्यय म्हणजे विपरीत ज्ञान. ह्यास मिथ्या ज्ञान म्हणतात. कारण ह्या ज्ञानाची प्रतिष्ठा जे त्यांचे रूप नाही अशा वस्तुवर झालेली असते .शुक्तिवर हे रजत आहे असे विपरीत ज्ञान होते. ह्याला मिथ्याज्ञान म्हणतात. ह्यासच कोणी अप्रमाज्ञान म्हणतात. अप्रमाज्ञानाची व्याख्या तदभावति तत्प्रकारको=नुभवः अशी आहे व यथा शुक्तिविंद रजतमिति ज्ञानम् हे उदाहरण म्हणून घेतले आहे.
                      शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः ।।९।।
      विकल्प म्हणजे विशेष कल्पना वस्तुशून्य असते. उदाहरणार्थ साखरेची गोडी म्हटली की ती गोडच असते ही विशेष कल्पना  मनात येते .तथापि ,गोड ही वस्तुशून्य आहे. ती वस्तू नाही . इतके असूनही गोडीचे ज्ञान शब्दाने करून देता येते म्हणून गोडीला शब्द ज्ञानानुपाती म्हणता येईल. विकल्प म्हणजे ज्याचे ज्ञान शब्दाने होते पण ते ज्ञान मात्र वस्तुस्वरूप नसते. भाष्यांत चैतन्यं पुरूषस्य स्वरूपम् हे विकल्पाचे उदाहरण दिले आहे. विशेष्याची जी विशेषणे ती सर्व विकल्पाचीच उदाहरणे आहेत. पतञ्ञलीच्या सूत्रानुसार शशशृंग, खपुश्प, वनध्यापुत्र ही विकल्पाची उदाहरणे म्हणून घेता येणार नाहीत. कारण वन्ध्यापुत्र हे पद उच्चारल्याबरोबर शब्दाने  कशाचेही ज्ञान होत नाही तर वस्तुस्वरूपाची  असिध्दता मात्र लक्षात येते. विकल्प यात जर अभावरूप वन्ध्यापुत्राची कल्पना यावी असे वाटत असले तर शब्दानुपाती वस्तुस्वरूपासिद्धो विकल्पः  अशी एक स्वतंत्र व्याख्या करावी लागले. पण पतञ्ञलीला  भावरूप अशी जी विशेषणात्मक वृत्ती तिचाच केवळ निरोध करावयाचा असल्याने  मुद्दाम शब्दज्ञानानुपाती म्हणजे  शब्दावरूनच ज्याचे स्वतंत्र ज्ञान होते पण ते ज्ञान मात्र वस्तुशून्य असते, वस्तुस्वरूप नसते, उदाहरणार्थ  सर्व भाववाचक नामे, त्यालाच  विकल्प म्हटले आहे.
                    अभावप्रत्ययालम्बना वृ्त्तिर्निद्रा ।।१०।।
    निद्रा ही एक वृत्ती आहे की ज्या वृत्तिला आलम्बन म्हणून अभाव प्रत्यय  आहे. तमस्वरूप हेच आलम्बन वृत्तिला असले की वृ्त्ती  तदाकार होते. तमस्वरूप हे अज्ञानमय असल्याने त्या ठिकाणी कशाचेही ज्ञान नसते व म्हणूनच जागे झाल्यावर मी मूढ होतो, मी झोपेत काहीही जाणले नाही असा प्रत्यय येतो. येथे अभाव याचा अर्थ वस्तू नसणे  असा घेतला  तर भूतले घटाभावः या उदाहरणात  जरी भूतलाशी  चक्षुःसन्निकर्ष आहे तरी वृत्ति मात्र घटाभावात्मक आहे व हीसुध्दा निद्रा होईल. पण प्रत्याक्षात  ती निद्रा नाही. म्हणून अभाव म्हणजे तम, अज्ञान, मूढता असा येथे अर्थ आहे.  तदाकार वृ्त्ती होणे ही  अज्ञानाशी एकरूपता हिचा समाधिला अडथळा होतो तो टाळावा असा या सूत्राचा आशय आहे.
                  अनुभूतविषयासंप्रमोषः स्मृतिः ।।११।।
    स्मृती म्हणजे पूर्वी अनुभवलेला जो विषय त्या अनूभूतविषयज्ञानाचा   नाश न होणे . पूर्वीचा अनुभवलेला  विषय  बरोबर  ध्यानी येणे याला स्मृती म्हणतात. संस्कारमात्रजन्यज्ञानं स्मृतिः अशी स्मृतिची व्याख्या तर्कसंग्रहात  आहे. ती देखील वरील सूत्राच्या आशयाची आहे.
            अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः ।।१२।।
      वरील  पाच वृत्ती प्रमाण ,विपर्यय,विकल्प, विद्राव स्मृति या जर कर्माचा ढिगारा वाढवणा-या अतएव क्लिष्ट  असतील तर अभ्यास व वैराग्य (आसक्ती नसणे ) या योगे त्यांचा निरोध करावा.
     
              तत्र स्थितौ यत्नो=भ्यासः ।।१३।।
     द्रष्टा त्याच्या स्वरूपात व्यवस्थित रहावा म्हणून केला जाणारा जो यत्न त्याला अभ्यास अशी संज्ञा आहे.

           स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमिः ।।१४।।
    तो अभ्यास बराच काळ सतत व ब्रह्यचर्य ,तत्त्वज्ञान, विद्या आणि कैवल्यसंपादनावरील विश्वास यांमुळे आपले जे प्रकृतिपासून भिन्न असलेले चेतन स्वरुप  त्याप्रत स्थित  राहातो. चित्तवृत्ती पूर्ण रोखल्या जाऊन द्रष्टा आपले जे  प्रकृतिपासून  भिन्न  असलेले चेतन स्वरूप त्याप्रत  स्थित  राहातो. चित्ताची वृत्तिरूपाने  प्रकट  होणारी अस्थिरता ही  निग्रहास फार कठीण  आहे. अर्जुनाने भगवंतास  प्रश्न केला-
   योगसूत्र समाधिपाद
   चंचलं हि मनः प्रमाथिबलवदृढम् । तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ।।
        यास उत्तर म्हणून भगवंताने अभ्यास व वैराग्य यांवर भर देऊन त्यायोगे चित्तताची स्थिरता सत्तवर होते असे ध्वनित केले आहे. भगवंत सांगतात -असंशयं महाबाहो मनोदुर्निग्रहं चलम् । अभ्यासेन तु कौन्तेय वैरैग्येण च गृह्यते ।।(भ. गी .६.३४). पुन्हा अभ्यासाची महती सांगितली  आहे. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्। अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय ।। (भ.गी. १२.९)
   
             दृष्टानुश्रविकविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यम् ।।१५।।
      दृष्टा म्हणजे इन्द्रियांच्याव्दारे उपभोगलेले ऐहिक विषय (स्त्री,धन, पुत्र, पशु, ऐश्वर्य,इत्यादि ) व श्रुतज्ञानामुळे अभिलाषा उत्पन्न झाली उदा. स्वर्गादिकाविषयी, असे आनुश्रविक विषय. यानाहिशी होऊन चित्त वश झाले आहे व कैवल्याच्या मार्गावर लागले आहे त्या चित्ताच्या भूमिकेस वैराग्य म्हणतात. चित्ताची ऐहिक व पारलौकिक भोग ,तृष्णा जाऊन ते वश होणे यावर भगवंताने गीतेत फार भर दिला आहे. ते सांगतात-
                      कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलाप्रदाम ।
                      क्रियाविशेषबहुलां भोगश्चर्यगतिं प्रति ।।
                      भोगैश्चिर्यप्रसत्कानां तयापह्तचेतसाम् ।
                      व्यवसायात्मिकाबुद्धिः  समाधौ न विधीयते।।
                      त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन।
                      निर्व्दन्व्दो नित्यसत्तस्थो निर्योगक्षोम आत्मवान् ।।
                      श्रुतिविप्रतिपन्ना ते यदास्थास्यति निश्चिला।
                      समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि।।
                                                         (भ, गी. २.५३)
  
   इन्द्रियांच्या वशतेबद्दलदेखील असेच म्हटले आहे.
          
     वशेहि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता।।
     असंयतात्माना  योगोदुष्प्राप इति मे मतिः
    वश्यात्मना तु यतता शक्यो=वाप्तुमुपायतः ।। (भ.गी. ६. ३६)
        
                       तत्परं पुरूषख्यातेर्गुणवैतृष्ण्यम् ।।१६।।
     सूत्र १५ मध्ये विषयगत निर्मोहानामुळे उत्पन्न झालेले जे वैराग्य ते अपर वैराग्य म्हणून सांगितले. या सूत्रात परवैराग्याची व्याख्या केली आहे. ज्ञानाच्या तीव्र  इच्छेमुळे सात्त्विक, राजस व तामस भोगांविषयीची तृष्णा संपुर्ण नाहीशी होणे, तथापि ,पुरूषाची प्रकृतिपासून भिन्नत्व पहाणे ही अभिलाषा मात्र तीव्र होत जाणे यास परवैराग्य म्हणतात. कैवल्यप्राप्तीस  नुसते अपर वैराग्य असून भागत नाही तर कैवल्याचीही इच्छा पाहिजे व ती इच्छा असणे हीच परवैराग्याची खूण आहे.
   
                        विर्तकविचारानन्दास्मितारूपानुगमात् संप्रज्ञातः ।।१७।।
       समाधिचे दोन प्रकार आहेतः सम्प्रज्ञात व अस्प्रज्ञात . या  सूत्रात संप्रज्ञात समाधिचे लक्षण सांगितले आहे. संप्रज्ञात समाधी चार प्रकारची आहे- विर्तकरूपानुगम, विचारानुगम, आनन्दानुगम व अस्मितामुगम. ज्यावेळी एखादी मूर्ती ध्यानाला आलम्बन म्हणून असते व तेथेच चित्त स्थित राहते तेव्हा ती वितर्कानुगम संप्रज्ञात समाधी असते. हे स्थुल आलम्बन आहे व त्यांत पाचही तन्मात्रांचे विचार ध्यावासाठी साहाय्यभूत होतात. त्यांपैकी जेव्हा एकच तन्मात्र विचाररूपात येईल त्यावेळी चित्तस्थिरता ही दुस-या प्रकारची संप्रज्ञात समाधी असते. जेव्हा त्याहून अधिक सूक्ष्मतर अशी आनंदात्मक वृत्ती होऊन राहील  तेव्हा ती तिस-या प्रकारची संप्रज्ञात समाधी व जेव्हा केवळ अहमाकार वृत्तिशी चित्ताची तन्मयता होईल तेव्हा ती चौथ्या प्रकारची संप्रज्ञात समाधी.
                 विरामप्रत्ययाभ्यासपूर्वः संस्कारशेषो=न्यः ।।१८।।
     अभ्यासपूर्वक जेव्हा अहमाकार वृत्ती नाहीशी झाल्याचा प्रत्यय येईल तेव्हा चित्त हे केवळ पूर्वजन्मार्जित संस्कारमय राहते. अर्थात ते    संस्कार पुरूषाला पुन्हा व्युत्थानस्थितीतल्या धर्माधर्माने बाध्य करीत नाहीत. ही असंप्रज्ञात समाधी असते.
    पातञ्ञल योगाची भूमिका सांख्याच्या तत्त्वज्ञानावर उभारलेली असल्याने येथे संस्कारशेष असे जे अन्त्यसमाधिचे वर्णन केले त्याचे विवेचन सांख्य तत्वज्ञानाला धरून या ठिकाणी केल्यास उचित होईल. सूत्र १.५० मध्ये म्हटल्याप्रमाणे अध्यात्मप्रसादापासून एक संस्कार उत्पन्न होतो त्यास तज्जः संस्कार म्हणजे ऋतंभरा प्रज्ञेपासून उत्पन्न झालेला संस्कार असे नाव आहे. या संस्काराचे स्वरूप म्हणजे पुरूष हा प्रकतिपासून अगदी भिन्न आहे हे होय. हा संस्कारसुद्ध जेव्हा लोप पावले तेव्हा पुरूष केवळ स्वरूपाने स्थित राहील व हीच निर्बीज समाधी अथवा पुरूषाची कैवल्यता.
        हा जो तज्ज संस्कार आहे हा असंप्रज्ञात समाधिमध्ये वावरणारे जे पूर्वजन्मार्जित असंख्य संस्कार आहेत त्याचा निरोध करतो. हे जे अन्य संस्कार आहेत ते संस्कार केवळ संप्रज्ञात समाधितील अहमाकार वृत्ती मावळल्यावरच असंप्रज्ञात समाधित भासमान होतात. अर्थात अहमाकार -वृ्त्तीचे संस्कार नाहिसे झाल्यावरच यांचा उदय होत असल्याने मागील सर्व जन्म त्या योग्यास त्या संस्कारामुळे आठवतील व भव म्हणजे संसार याची यथार्थ जाणीव त्यास होईल. ती जाणीव कदाचित् हा संसार (भव) केवळ संस्कारमात्रजन्य आहे याही स्वरूपाची असेल. यावरून असंप्रज्ञात समाधिमध्ये जे संस्कारशेषत्व आहे( संस्काराचे शिल्लक असणे हे स्वरूप आहे) ते धर्माधर्मादिकास कारम नसून केवळ धारण करण्यासाठीच असतात. या विषयी खालील आधार म्हणून घेता येईलः

             सम्यग्ज्ञानाधिगमाद्धर्मादीनामकारणप्राप्तौ ।
             तिष्ठति संस्कारवशाच्चक्रभ्रमिवद्धृतशरीरः ।।

         भवप्रत्ययोविदेहप्रकृतिलयानाम् ।।१९।।
     असंप्रज्ञात समाधिमध्ये जो अहमाकार वृत्तिचा अभाव आहे व केवळ संस्कारशेषत्व आहे त्यामुळे भव म्हणजे संसार याची योग्य जाणीव जे विदेह प्रकृती रूपात आहेत अशांना अर्थात् देवांना सहज होते. हा संसार केवळ पूर्ववासना निर्मित असल्याने त्या  प्रकृतिजन्य  संस्कारापासून ,अलिप्त राहून कैवल्यसुखाची म्हणजेच पुरूषप्रकृतिभिन्नत्व जाणून घेण्याची , अभिलाषा  विदेही म्हणजेच देव  अथवा योगी धरतात.
  
              श्रद्धावीर्यस्मृतिसमाधिप्रज्ञापूर्वक इतरेषाम् ।।२०।।
    इतर योगी हे असंप्रज्ञात समाधित जाऊन संसाराचे संस्कारमय स्वरूप जाण्याची श्रद्धा, तप, स्मृती (आठवण) , समाधी , प्रज्ञा यांची मदत घेतात.
     श्रद्धा म्हणजे पुरूष हा प्रकृतीपासून पूर्णपणे भिन्न आहे या तत्तवावर विश्वास . वार्य म्हणजे पुरूष प्रकृतिहून भिन्न आहे ही जाणीव  करून घेण्यासाठी लागणारे तपाचरण.
     स्मृती म्हणजे अहमाकार (अस्मितानुरूप) जाणीव राहाणे. या जाणीवेचे अर्थातच निराकारण करावयाचे असते. केवळ संस्काराचीच जाणीव असणे ही समाधी व प्रज्ञापूर्वक (-अर्थात बुद्धिला हा सर्व संसार संस्कारमय आहे अशा अर्थाचे ज्ञान होऊन ) या भावाचा प्रत्यय येणे हे सर्व इतर देहधारी योग्यांच्या बाबतीत होते.

   पातञ्ञल योगसूत्र
    समाधिपाद
                  तीव्रसंवेगानामासन्नः ।।२१।।
       तीव्र योग (योग्य जाणण्याची इच्छा, अर्थात असंप्रज्ञात समाधिकडे जाण्याची तीव्र इच्छा ) ज्यांच्याजवळ आहे अशा योग्यांना सत्वर 'अस्मितावृत्तिचा' विसर पडून असंप्रज्ञात समाधिचा लाभ होतो.

                  मृद्रुमध्याधिमात्रत्वात्ततो=पि विशेषः ।।२२।।
     काहींचा हा तीव्र संवेग सौम्य तर काहींचा त्यापेक्षा जरा उत्कट तर काहींचा फारच जलद असतो. असे तीव्र संवेगात देखील विशेष भेद आहेत.
     
             ईश्वरप्रणिधानाव्दा ।।२३।।
       (तीव्र संवेगामुळेच समाधिलाभ होतो असे नसून) ईश्वरास भक्तिपूर्वक (प्रणिधानात) आळविणे असता त्याच्या ध्यानामुळेसुद्धा सत्वर समाधिलाभ होतो.
 
                 क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्टः पुरूषविशेष ईश्वरः ।।२४।।
        या सूत्राचा अर्थ करण्यापूर्वी पुरूषविशेष याचे विवेचन आवश्यक आहे. पुरूषविशेष या शब्दाने 'Personal God,' ही कल्पना मनात येते. सांख्य व योग यांच्या मते Absolute ही कल्पना नाही. Absoulte  या शब्दाने  The ultimate being is one - a simple power  ही कल्पना समजून येते. ही कल्पना सांख्याची अगर योगाची नाही. सांख्य व योग हे बहुपुरूषवादी आहेत. 'बहवाः पुरूषा राजन् सांख्ययोगविचारिणाम्।' असे महाभारतकाराचेही मत आहे. म्हणून पुरूषविशेष अथवा Personal God याची कल्पना खालीलप्रमाणे करता येईल  :
      It is not limitations inherent in human personality that we  imply when we ascribe personality to God, but all the positive attributes that constitute man's superiority to beasts carried to a much highter level and freed from the limitations by which they are in us conditioned; applied to God all such terms must be understood ' sensus eminenotry '(Rashdall- Theory of Good & evil Book III Ch. IV)
            या विवेचनावरून सूत्राचा अर्थ असा की अविद्यादिक क्लेश , कुशल व अकुशल कर्म यांचे फळ मिळणे हा विपाक व त्या फलानुगत वासना मनात असणे हा आशय या सर्वांनी रहित असा जो पुरूषविशेष तोच ईश्वर व हा ईश्वर सदैव मुक्त पूरूष आहे.
             तत्र निरतिशयं सर्वज्ञबीजम् ।।२५।।
     त्या परमेश्वरात पुर्णत्वाने सर्वज्ञत्वाचे बीज आहे. म्हणजेच तोच संपूर्ण जाणू शकतो. 'निरतिशयं नाम यतः परमतिशयवत्ता नास्तीति।' (महाभारत)
            स पूर्वेषामपि गुरूः कालेनानवच्छेदात् ।।२६।।
        गुरूपदवी प्राप्त झालेले पूर्वीचे जे महान ऋषी त्या सर्वांचा देखील तो गुरू आहे कारण त्याचे ठिकाणी अवच्छेदकत्व नाही -कालाने हा बद्ध होऊ शकत नाही -मात्र पूर्वऋषींचाच तो गुरू होता व आता तो गुरू नाही असा भाव नसून तो सर्वदाच गुरू आहे.

                    तस्य वाचकः प्रणवः ।।२७।।
    त्या ईश्वराचा वाचक ओंकार आहे. वाचक म्हणजे बोध करून देणारा .
       
      तज्जपस्तदर्थभावनम् ।।२८।।
          ओंकाराचा जप करताना ईश्वराची भावना करावी. 'भावना नाम पुनःपुनरीश्र्वरचिन्तनम्।'
 
                    ततः प्रत्यक्चेतनाधिगमो~प्यन्तरायाभावश्र्च ।।२९।।
   त्या ओंकाराच्या जपापासून व ईश्वर भावनेमुळे प्रचितीला येणारे असे जे चैतन्य त्याचा अधिगम -साक्षात्कार होऊ लागतो व जे अंतराय (विघ्ने) आहेत ते पूर्णपणे नाहिसे होतात. 

  पातञ्ञल योगसूत्र
        समाधिपाद
    व्यधिस्त्यानसंशयप्रमादालस्याविरतिभ्रान्तिदर्शनालब्ध-
    भुमिकत्वानवस्थितत्वानि चित्तविक्षेपास्ते=न्तरायाः ।।३०।।
          साक्षात्कारामध्ये जी विघ्ने येतात ती वरील सूत्राने सांगतात, चित्तामध्ये विक्षेप उत्पन्न करणारे जे अन्तराय (व्यत्यय) आहेत ते म्हणजे व्याधी ,स्त्यान ,संशय, प्रमाद, आलस्य, अविरति, भ्रान्तिदर्शन, अलब्धभुमिकत्व व अनवस्थितत्व ही होत. शरीरीतील वात, पित्त, कफ अथवा खाल्लेले, प्यालेले विविध रस यांत विषमता उत्पन्न होणे, इंद्रियांना दुखापत पोहचणे यास व्याधी म्हणतात. अकर्मण्यता(कर्म करण्याची अयोग्यता) चित्तात असणे यास स्त्यान म्हणतात. समाधिची सिद्धता खरी अथवा खोटी आहे असे उभयकोटिक विचार मनात येणे यास संशय म्हणतात. समाधिस पोहचण्यासाठी जो मार्ग निश्चित केला आहे त्याचे योग्य पालन न होणे यास प्रमाद म्हणतात. अनियमितपणामुळे शरीरात शैथिल्य येणे यास आळस म्हणतात. आळस म्हणजे 'जाडयामुळे शरीराची व चित्ताची समाधिमार्गाकडे प्रवृत्ति न होणे'  असे विवेचन भाष्यांत आहे.
          समाधिमार्गाचा अवलंब करीत असता विषय संप्रयोगामुळे चित्तात विषयासंबंधी  तृष्णा उत्पन्न होऊन चित्तप्रवाह सारखा त्या विषयाकडे जाणे यास अविरति म्हणतात. विरति म्हणजे चित्ताची विषयाकडे जाण्यापासून स्तब्धता. भ्रान्तिदर्शन म्हणजे विपर्ययज्ञान, जशी वस्तू आहे तसे ज्ञान न होता विपरीत ज्ञान होणे.
         अलब्धभूमिकत्व म्हणजे समाधिला पोहचण्यासाठी ज्या भिन्न भिन्न भूमिका आहेत त्यांचा लाभ न होणे. जरी एखाद्या भूमिकेचा अभ्यासाने लाभ झाला तरी चित्त त्या ठिकाणी अवस्थित (स्थिर) न राहणे, हे चित्ताचे अनवस्थित्व. वरील अडथळ्यांमुळे चित्तात विक्षेप उत्पन्न होतात.
         
                   दुःख दौमर्नस्याङ्गमेजयत्वश्वासविक्षेपसहभुवः ।।३१।।
      सहभूः म्हणजे natural, innate, त्याच क्षणाला उत्पन्न होणारे. या ठिकाणी सहभुवः याचा अर्थ सहचारी असा आहे. वरील ३० व्या सूत्रात जे अन्तराय (अडथळे) सांगितले आहेत त्यांचेच सहचारी दुःख, दौर्मनस्य, अंगमेजयत्व, श्वास व प्रश्वास हे आहेत. दुःखे तीन प्रकारची आहेतः आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक.
     इच्छापूर्ती न झाल्याने (इच्छेचा विघात झाल्याने) जो चित्ताचा क्षोभ होतो त्यास दौर्मनस्य म्हणतात. यालाच क्रोध असे नाव आहे. 'कामात्क्रोधोभिजायते', 'कामात्कुतश्चित् प्रतिहतात् क्रोध~भिजायते', असे वर्णन भ. गीतेत आहे.
 (२.६२) अंगमेजयत्व म्हणजे अंगास कंप सुटणे. श्वास म्हणजे बाहेरील वायु आत घेणे व प्रश्वास म्हणजे आत घेतलेला वायु बाहेर टाकणे. ज्यांचे चित्त स्थिर झाले आहे त्यांच्या ठिकाणी वरील अन्तराय सहचारी उत्पन्न होत नाहीत.

                 तत्प्रतिषेधार्थमेकतत्त्वाभ्यासः ।।३२।।
            तीस व एकतीस सूत्र मुळून जे अन्तराय व त्यांचे सहचारी यांचे वर्णन केले त्यांचा पूर्ण प्रतिरोध (निरोध) करण्यासाठी एकतत्त्वाचा अभ्यास करावा. अर्थात् , कोणत्या तरी एका वस्तुवर चित्त स्थिर करण्याचा अभ्यास करावा.

                  मैत्रीकरूणामुदितोपेक्षाणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनम् ।।३३।।
            जे प्राणी सुख-सम्पन्न आहेत त्यांच्याविषयी मैत्रीची भावना ठेवणे, जे प्राणी दुःखी आहेत त्यांच्याबद्दल करूणा बाळगणे, त्यांची कीव करणे, जे प्राणी पुण्यवान् आहेत त्यांच्याबद्दल आनंद प्रकट करणे , अशा भावनांनी चित्तात प्रसन्नता उत्पन्न होऊन ते चित्त सहज एककोन्द्री होऊन एकाग्रतेला पोहचते.
                           रागव्देषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् ।
                          आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ।।
                           प्रसादे सर्वदुःखांना हानिरस्योपजायते।
                          प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ।।
                                                       (भ.गी. २.६४. ६५)
  
                प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य ।।३४।।
    चित्त प्रसन्न होऊन एकाग्र होण्यासाठी जे अन्य उपाय सुचविले जातात त्यांचा 'वा' (अथवा) या पदाने निर्देश केला जातो. प्राणाचे प्रच्छर्दन व विधारण करण्यासाठी देखील चित्त प्रसन्न होऊन एकाग्र होते.
            छातीत व नासिकापुटात घेतलेला जो प्राण त्याचे अतिशय प्रयत्नाने हळूहळू बाहेर बमन करणे धीमेपणाने श्वास बाहेर सोडणे यास प्रच्छर्दन म्हणतात व एकदा श्वासबाहेर सोडला की परत एकदम आत न घेता तसाच बाहेर रोखून धरणे यास विधारण  म्हणतात. या विधारणास कोणी बाह्य कुम्भक म्हणतात. यामुळेही चित्त प्रसन्न होते.

                    विषयवती वा प्रवृत्तिरूपन्ना मनसः स्थितिनिबन्धनी ।।३५।।
    मनसः स्थितिनिबन्धी= मनाच्या स्थितीला बांधणारी
    विषय समोर नसताना जी विषयासंबंधी प्रवृत्ती उत्पन्न होते त्या अभिलाषेतच मन स्थिर होऊन राहणे यानेदेखील चित्ताची एकाग्रता होते. नासिकेचा विषय वास आहे. विषयरहित दिव्य गन्धाची संवेदना उत्पन्न झाली तर त्या कल्पनेत देखील चित्ताची एकाग्रता होईल. जसे घ्राणेन्द्रियाचे तसेच इतर इंद्रियांचदेखील आहे.

                       विशोका वा ज्योतिष्मती ।।३६।।
       ह्दय हे कमळाच्या आकाराचे  आहे. त्यात एक प्रकारचा सात्त्विक प्रकाश आहे. तो 'ज्योतिष्मती' या पदाने सूत्रात निर्दिष्ट आहे. ती ज्योत रजोगुणरहित म्हणून 'विशोका' या पदाने संबोधिली आहे.  त्या सात्त्विक प्रकाशावर चित्त स्थिर केले असता चितैकाग्रता लवकर होते. या सूत्राचा अर्थ असा ,'ह्त्पद्मसंपुटमध्ये प्रशान्तकल्लोलक्षिरोदधिप्रख्यं चित्तसत्तवं भावयतः प्रज्ञालोकात्सर्ववृत्तिपरिक्षये चेतसः स्थैर्यमुत्पद्यते।'  (भोजवृत्ती)

                       विरागविषयं वा चित्तम् ।।३७।।
     ज्या चित्तातून अभिलाषा संपूर्ण गेली आहे असे चित्त ध्यानासाठी विषय होऊ शकते. वीतरागः परित्यक्तविषयाभिलाषः; तस्य यच्चित्तं पुरिह्तक्लेशं तदालम्बनीकृतं चेतसः स्थितिर्हेतुर्भवति।' (भोजवृत्ती)

                                    स्वप्ननिद्राज्ञानालम्बनं वा ।।३८।।
     स्वप्नज्ञान अथवा निद्राज्ञान हे देखील ध्यानास आलम्बन म्हणून घेतले असता चित्त स्थिर होते.
     जर पहाटे सुंदर स्वप्न पडले व तेच स्वप्न ज्ञान-ध्यानासाठी आलम्बन घेतले तर चित्त लवकर स्थित होते. वाचस्पति म्हणतात, 'यदा खल्वयं स्वप्ने मनोहरां भगवतो महेश्वरस्य प्रतिमामाराधयन्नेव प्रबुद्धः प्रसन्नमनस्तदा तामेव स्वप्नज्ञानालम्बनीभूतामनुचिन्तयतस्तस्य तदेकाकारमनसस्तत्रैव चित्तं स्थितिपदं लभते।'
      उत्तम झोप आली असता मी सुखाने झोपलो होतो या ज्ञानावर देखील मन त्वरित एकाकार होते. 'निद्राचेह सात्त्विकी  ग्रहीतव्या यस्याः प्रबुद्धस्य सुखमहस्वाप्समिति प्रत्यवमर्शो भवति एकाग्रं हि तस्यां मनो भवति।'
        
                      यथाभिमतध्यानाव्दा ।।३९।।
         ज्या वस्तू अगर विषयावर त्वरित ध्यान लागले त्याचे ध्यान करावे . एकदा चित्ताला एकाकार होण्याची सवय लागली की ते वाटेल ते आलम्बन सहज ध्यानासाठी घेऊ शकते. 'यदेवाभिमतं तदेव ध्यायेत् तत्र लब्धस्थितिकमन्यत्रापि स्थितिपदं लभत इति।'
  
·                                 परमाणु परममहत्त्वान्तो~स्य वशीकारः ।।४०।।
·                          एकदा चित्ताला कोणतेही आलम्बन घेऊन एकाग्र होण्याची सवय झाली की सूक्ष्मात सूक्ष्म जो परमाणू तोसुद्धा सहज ध्यानाचा विषय होतो व महताहून महत् असे जे परम तेही ध्यानाला आलम्बन होऊ शकते. उभय कोटीत निर्विघ्नपणे ध्यान करता येणे  याला वशीकरण संज्ञा आहे.
·                     
        क्षीणवृत्तेरभिजातस्येव मणेर्ग्रहीतृग्रहणग्राह्येषु
             तत्स्थतदञ्ञनता समाप्तिः ।।४१।।
       ज्या चित्ताच्या वृत्ती क्षीण झाल्या आहेत अशा चित्तामध्ये ग्रहीतृ (ग्रहण करणारा पुरुष) ग्रहण (इंद्रीये) व ग्राह्य (विषय) यांची आत्यंतिक तन्मयता (तदञ्जनता-एकरूपता) होते, त्याला समाप्ति म्हणतात. याला अभिजात (तेजेस्वी) मण्याचा द्दष्टान्त दिला आहे. एखादा तेजेस्वी मणी स्फटिकाच्या आश्रय रूपाच्या आकारानेच भासमान होतो 'यथा स्फटिक उपाश्रयभेदात्तत्तद्रूपोपरक्त उपाश्रययरूपाकारेण निर्भासते।' त्याप्रमाणे ग्रहण करणारा जो पुरूष त्याची ग्राह्य आलम्बलनाशी एकरूपता होते,  'तथा ग्राह्यालम्बनोपरक्तं चित्तं ग्राह्यसमापन्नं ग्राह्यस्वरूपाकारेण निर्भासते।'
        तदञ्जनतासमापत्तिः म्हणजे एकोपा, जुळणी  (ग्राह्यारूपाचे होणे).  तदज्जनता= त्या आकाराचे होणे (तदाकारापत्तिः) तत्स्थदञ्ञनता तेषु स्थितस्य तदाकारापत्तिः = ग्राह्याप्रत स्थिर झाल्यामुळे त्या आकाराप्रत प्राप्त होणे .
        वरील ४१ व्या सूत्रात सांगितलेली समाप्ति दोन प्रकारची आहे. एक सवितर्का समाप्ति व दुसरी निर्वितर्का समापत्ति. ४२ व्या सूत्राने पहिल्या समापत्तिचे कथन करतात.
   
         तत्र शब्दार्थज्ञानविकल्पैः संकीर्णा सवितर्का समापत्तिः ।।४२।।
     संकीर्णा =व्यामिश्रा (मिश्रित). ज्या चित्ताच्या ग्राह्याकाराच्या जुळणीत केवळ शब्द, त्याचा अर्थ व त्या अर्थाचे ज्ञान यांचे मिश्रण कायम राहाते त्यास सवितर्का समापत्ति म्हणतात. स=सह, वि=विशेषव तर्क=कल्पना,कोटी सवितर्का समापत्ति म्हणजे जी जुळणी शब्द , अर्थ व ज्ञान या विशेष तर्कासमवेत असते अशी . या ठिकाणी ग

भासमान 
  योगसूत्र समाधिपाद
   ४२
   या ठिकाणी ग्रहीतृ, ग्रहण व ग्राह्य ही त्रिपुटी  कायम नसून शब्द ,अर्थ व ज्ञान ही ग्राह्य वस्तुचीच त्रिपुटी असते. 'स्फोटरूपो शब्दः। अर्थो जात्यादि । ज्ञानं वस्तुस्वरूपाकारा सत्त्वप्रधानबुद्धिवृत्तिः। एतत् स्वरूपो विकल्पः ।'

      स्मृतिपरिशुद्धौ स्वरूपशून्येवार्थमात्रनिर्भासा निर्वितर्का ।।४३।।
            परिशुद्धिः = अपगम; टाकून देणे
      ज्या प्रज्ञेने शब्द ,अर्थ  व ज्ञान ही त्रिपुटी संपूर्ण टाकली आहे अशा प्रज्ञेने स्वतःचे ग्रहण करण्याचे स्वरूप टाकून देऊन ग्राह्यपदार्थमात्राचे जे स्वरूप आहे ती स्वरूपता प्राप्त केली आहे, असे जेव्हा स्वरूप होईल तेव्हा त्या स्थितीस निर्वितर्का समापत्ति असे म्हणतात.
       'प्रज्ञा स्वामिव प्रज्ञास्वरूपं ग्रहणात्मकं त्यक्त्वा पदार्थमात्रस्वरूपाग्राह्य-स्वरूपान्नेव भवति तदा निर्वितर्का समापत्तिः।'
   प्रज्ञा ही ग्राह्याशी एकीभूत झाल्याने तिचे मूळचे ग्रहण करण्याचे स्वरूप जणू नाहीसे झाल्यासारखे दिसते. म्हणून या प्रज्ञेसाठी स्वरूपशून्यइव असे पद वापरले आहे. केवळ ग्राह्यकाराने भासते म्हणून 'अर्थमात्रनिर्भासा ' हे पद वापरले आहे.
योगसूत्र समाधिपाद

                      एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता।।४४।।
         सवितर्का निर्वितर्का समापत्तिच्या व्याख्यानाने 'सविचारा सूक्ष्मविषया समापत्ति' व 'निर्विचारा सूक्ष्म विषयासमापत्ति'चेही विवेचन झाले असे समजावे .हे विवेचन असे- सूक्ष्म विषय म्हणजे तन्मात्र. ४२ व ४३ सूत्रात महाभूत हे बुद्धिचे आलम्बन (ग्राह्य विषय) होते. पण जेव्हा सूक्ष्म स्वरूपात असलेले तन्मात्र बुद्धीचे जर शब्द , अर्थ व ज्ञान या विकल्पाने सहित (युक्त) अशी ग्राह्यकार झाली व विशिष्ट देशकाल जाणीव याने परिमित असली (अविच्छिन्न) तर तिला 'सविचारा सूक्ष्मविषयासमापत्ति' व देशकालधर्मरहित, शब्द, अर्थ, ज्ञान या विकल्पाचे भान न होता केवळ सूक्ष्म विषयाच्या स्वरुपाची असेल तर तिला 'निर्विचारासूक्ष्म विषया-समापत्ति' असे म्हणावे. या सूत्रावरील भोजवृत्ती अशी-
       सूक्ष्म विषया-सूक्ष्म तन्मात्रेन्द्रियादि विषयो यस्याः सा।
    शब्दार्थविषयत्वेन शब्दार्थविकल्पसहितत्वेन देशकालधर्मद्यवच्छिन्नः
    सूक्ष्मो=र्थः प्रतिभाति यस्यां सा सविचारा। देशकालधर्मादिरहितो धर्मिमात्रतया सूक्ष्मोर्थस्तन्तमात्रेन्द्रियरूपः प्रतिभाति यस्यां सा निर्विचारा।
    सूक्ष्मविषय यांचा सांख्यांचे पञ्चतन्मात्र असा अर्थ करावा.

          सूक्ष्म विषयत्वं चालिङ्गपर्यवसानम् ।।४५।।
     बुद्धी सूक्ष्म, अधिक सूक्ष्म अशी ग्राह्याकार होऊ लागली की ती पञ्चतन्मात्रांचे आलम्बन सोडून त्याहून सूक्ष्मतर असा जो अहंकार तोच  ग्राह्याला आलंबन म्हणून घेते. एकदा अहंकाराला आलंबन म्हणून घेण्याची सवय झाली की त्याहून अधिक सूक्ष्म जे मह्त, तिथे चित्त पोहोचते. मह्दाहून अतिसूक्ष्म अशी जी प्रकृती त्या प्रकृतीग्राह्यापर्यन्त एकदा बुद्धी गेली की त्या पलीकडे  ग्राह्य  काही नाही . म्हणून प्रकृती या सूक्ष्म विषयाला 'अलिंगपर्यवसायित्व ' आहे . हे जे प्रकृतिलाच सूक्ष्म विषय ग्राह्यासाठी ( अर्थात् आलम्बनासाठी) ग्रहण करणे आहे याचे पर्यवसान याहून अधिक सूक्ष्म ग्राह्यालंबनात नाही कारण प्रकृतिहून  अधिक सूक्ष्म काही नाही. लिंगपर्यवसानम् म्हणजे एखाद्या विषयाचे  (अर्थात् कार्याचे) आपल्या कारणात लीन होणे. महाभूते पञ्चतन्मात्रंत लीन होतात. मह्त हे पञ्चतन्मात्र अहंकारात लीन होतात. अहंकार महत् मध्ये लीन होतो. मह्त हे प्रकृतिमध्ये लीन होते. म्हणून महत् पर्यन्त सर्वाना लिङगपर्यवसायित्व आहे. पण प्रकृतिला लिंगपर्यवसायित्व नाही.  ती अतिसूक्ष्म  आहे. म्हणून सूत्रांत ,सूक्ष्मात सूक्ष्म जी पकृती , तेथेपर्यन्त  बुद्धी जाते असे म्हटले आहे. ती प्रकृती इतर कशातही (अधिक सूक्ष्मात) लीन होत नाही, कारण तीच सर्वांचे मूळ आहे म्हणून तिला अलिंगपर्यवसायित्व आहे यावर कोणी अशी शंका घेईल  की पुरूष हा तर प्रकृतिहून अधिक सूक्ष्म आहे. त्यात पर्यवसान न पावता प्रकृतिपर्यन्तच ग्राह्याकारता का स्वीकारली?
         तर याचे उत्तर असे की , प्रकृती जशी  जगत् प्रपंचात अनुस्यूत (अन्वयिकारण) आहे तसा पुरूष अनिस्यूत नाही. तो ग्राहक अत एव केवळ हेतू आहे. म्हणून प्रकृतीमध्येच सूक्ष्मपणा निरकिशयाने आहे व पिकृती हा जो ग्राह्याचा विषय आहे त्याला  अलिंगपर्यवसान म्हटले कारण प्रकृती अन्य कशातही लय पावत नाही.

                ता एव सबीजः समाधिः ।।४६।।
    ता म्हणजे चार समापत्ति-सवितर्क, निर्वितर्क, सविचार व निर्विचार. या आलम्बनसहित असतात. एकदा चित्त प्रकृतिलाच ग्राह्यालंबनासाठी घेऊन तदाकारतेला प्राप्त झाले की, त्याच चित्ताच्या स्थितीला सबीज समाधी म्हणतात. सबीज म्हणण्याचे कारण प्रकृती ही जगत् व्यापाराला कारण आहे. या सबीज समाधिपासून निर्बीज समाधी साधावयाची आहे हे अभ्यासू व्यक्तींनी लक्षात ठेवावे म्हणून हे सूत्र उद्धृत केले आहे.

               निर्विचार वैशारद्ये=ध्यात्मप्रसादः ।।४७।।
    वैशारद्य याचा अर्थ निर्मलता, प्रवीणता. निर्विचाराची निर्मलता प्राप्त झाली की कोणत्याही सूक्ष्म विचारापासून मन पूर्ण अलिप्त राहिल व तोच त्या चित्ताचा अध्यात्मप्रसाद. 'निर्विचारा सूक्ष्मविषया समाप्ति' चे पर्यवसान अलिंगापर्यन्त होते. हा विषय सूत्र ४३-४५ मध्ये आला आहे. त्यात सांगितलेली निर्वितर्कता ही मुख्य  असून ती जेव्हा संपूर्ण क्लेश-वासनारहित होईल तेव्हा जी चित्ताची शुद्धता त्यालाच अध्यात्मप्रसाद म्हणतात.

                    ऋतंभरा तत्र प्रज्ञा ।।४८।।
    चित्ताच्या अध्यात्मप्रसादावस्थेत प्रज्ञा ही ऋताने (सत्याने) भरलेली असते.  तत्र म्हणजे अध्यात्मप्रसादाचा लाभ झाल्यावर. त्यावेळी जगदस्तित्वाबद्दल, प्रधान-पुरूषाबद्दल, व्यक्ताव्यक्ताबद्दल सत्य ज्ञान होते, प्रधान हा शब्द सांख्याशास्त्रात प्रकृती या अर्थाने वापरतात. अध्याय२ सूत्र पाच मध्ये अविद्येचे लक्षण दिले आहे. तसे अविद्यात्मक ज्ञान प्रज्ञेला नसते. भोजदेव वृत्तीच्या या सूत्रावरचे स्पष्टीकरण असे - 'ऋतं सत्यं बिभर्ति कदाचिदिप न विपर्ययेणाच्छाद्यते सार्तंभरा प्रज्ञा तास्मिन् सति भवतीत्यर्थः ।
      या सूत्रावर अशी शंका आहे की, श्रुतज्ञानाने (आगम प्रमाणाने) आणि अनुमान प्रमाणाने सत्याविषयी ज्ञान होऊनदेखील प्रज्ञा ही ऋतंभरा, (सत्य जाणणारी) होतेच. तशी जर ती होणार  नाही तर श्रुत व अनुमान प्रमाण याला काहीच अर्थ राहणार नाही. असे असता निर्विचार वैशारद्यावस्थेतच प्रज्ञा ऋतंभरा, सत्य -यथार्थ -जाणणारी होते असे  का म्हटले? यावर ४९ व्या सूत्राने उत्तर देतात-
  
              श्रुतानुमानप्रज्ञाभ्यां सामान्यविषया विशेषार्थत्वात् ।।४९।।
      श्रुतज्ञान अथवा अनुमान यामुळे प्रज्ञेला पुरूष-प्रधान ,व्याक्तव्यक्त,जडाजड यांचे सामान्य ज्ञान होते. विशेष ज्ञान म्हणजे स्फुटरूपाने होणारे ज्ञान अर्थात् प्रत्यक्ष भासमान ज्ञान. चित्ताच्या निर्विचारवस्थेत जेव्हा प्रज्ञा केवळ ऋताने भारली जाते तेव्हाच विशेष ज्ञान होते.
      श्रुतानुमानाभ्यां या जायते प्रज्ञा सा सामान्य विषया। इयं पुनर्निविचारवैशारद्यसमुद्भवा प्रज्ञा ताभ्यां विलक्षणा। विशेषविषयत्वात्।
      
                   तज्जः संस्कारो=न्यसंस्कार प्रतिबन्धी ।।५० ।।
    अध्यात्मप्रसादामुळे प्रज्ञा जेव्हा ऋतंभरा होते त्यावेळी पुरूषप्रकती भिन्नत्वाविषयी, जडाजडाविषयी, जीव  आणि जगत् संस्कार व वासना यांनी बद्ध आहेत याविषयी जो एक कायमचा जगत् तिटका-याचा संस्कार होतो तो संस्कार अन्य वासनारूपी संस्काराला प्रतिबंध करतो. अर्थात् जीवाला समाधिमध्ये  जगताच्या जडत्वाविषयी होणारा संस्कार अगर 'पुरूष प्रकृतिहून भिन्न आहे.'  अशा स्वरुपाचा होणारा संस्कार अन्य वासनारूपी संस्कारामुळे पराभूत होत नाही. समाधिमध्येसुद्धा काही व्युत्थानाला नेणारे  वासनामय संस्कार असतात. त्या संस्कार म्हणजे  अध्यात्मप्रसादामुळे  जी प्रज्ञा  ऋतंभरा झाली  आहे,  अर्थात् सत्याने भारली गेली आहे त्या प्रज्ञेपासून होणारा जगताच्या जडत्वाविषयी संस्कार . अन्य संस्कार म्हणजे वासनामय संस्कार.

               तस्यापि निरोधे सर्वनिरोधान्निर्बीजः समाधिः ।।५१।।
       ४६व्या सूत्रात जी  सबीज समाधी सांगितली तिचाही निरोध केला असता, म्हणजे जो एक शेवटचा संस्कार राहातो की ज्यांत 'प्रकृती पुरूष अत्यन्त भिन्न आहेत या स्वरूपाची जाणीव होते', त्या संस्काराचाही निरोध केला असता निर्बीज समाधी प्राप्त  होते.
          चित्ताची वृत्ती अन्त्यन्त सूक्ष्म अशा प्रकृतिशी तदाकार होते. या सूक्ष्म आलंबनाचा अलिंगपर्यवसायित्व आहे म्हणजे प्रकृती कशातही  लीन पावत नाही, कारण तीच सर्वांचे  मूळ कारण  आहे. चित्तवृत्ती ही प्रकृतिच्या आकारास प्राप्त झाली की ती निर्विकार अशी  जी सूक्ष्म विषयाची जाणीव (शब्द, अर्थ व तज्जन्य ज्ञान या विकल्पाने रहित अशी जी जाणीव) त्या समापत्तिप्रत प्राप्त होते. त्या अवस्थेत जगताकडे खेचणारे असे व्युत्थानरूपी वासनामय कोणतेच संस्कार राहत नाही  कारण या सर्व वासनामय संस्काराचा एका संस्काराने प्रतिबंध होतो. व तो संस्कार म्हणजे 'प्रकृती पुरूषाहून भिन्न आहे' ही जाणीव. सर्वांत शेवटी हाही संस्कार नाहीसा होऊन अध्यात्मप्रसादामुळे चित्तवृत्तींचा संपूर्ण लय होऊन केवळ पुरूषाकार स्वरूपनिष्ठ शुद्ध असे राहाते व हीच निर्बीज समाधी.
     येथे पातज्जल योगसूत्राचा प्रथमाध्यास समाप्त झाला. 
 -----------------------------------------------------------------------














 







             
    





















   
      

योगसूत्र कैवल्यपाद सूत्र 1-34 full

योगसूत्र कैवल्यपाद
 Author -- Dr Balram Sadashiv Agnihotri
Typed by Ashwini -- To proof read
   
    जन्मौषधिमन्त्रतपः समाधिजाः सिद्धजाः सिद्धयः ।।१।।
    काही सिद्धी जन्मानिमित्त (म्हणजे जन्म घेतल्यामुळेच) असतात. कपिल मुनींना जन्मतःच सर्वज्ञत्व होते. पक्ष्यांना  जन्मतःच आकाशगमनाची सिद्धी असते. काही सिद्धी औषधनिर्मित्ति असतात. काही सिद्धी मन्त्राच्या योगाने प्राप्त होतात, काही तपाच्या योगाने तर काही समाधिपासून प्राप्त उत्पन्न होतात. या सर्वांचे वर्णन विभूतिपादात
आले आहे.
       
          जात्यन्तर परिणामः प्रकृत्यापूरात्।।२।।
  एक देह जाऊन अन्य देह येणे हा जो परिणाम अथवा 'एक मनुष्यजाती' जाऊन अन्य 'देवजाती' प्राप्त होणे हा जो परिणाम यास जात्यन्तर परिणाम म्हणतात. पूर्वीच्या ज्या प्रकृती त्यांच्या्मध्ये असलेले जे विकार तेच विकार अन्य कमी विशिष्ट जातिरूपाने  परिणाम पावतात. पाश्चात्या एव हि प्रकृतयो=मुष्मिञ्ञन्मानि विकारानापूरयन्ति जात्यन्तराकारेण परिणामयन्ति।'

             निमित्तप्रयोजकं प्रकृतीनां वरणभेदस्तु ततः क्षेत्रिकवत् ।।३।।
    प्रकृतिला अन्य जाती प्राप्त होणे म्हणजे एक देह जाऊन अन्य देह प्राप्त  होणे किंवा दुसरा कोणताही आपूर (पूर्णता, परिपक्कता) प्राप्त होणे  या परिणामाला धर्मादिक निमित्त प्रयोजक हेतू नाही कारण प्रकृतिचा स्वभावच परिवर्तन पावण्याचा आहे. मग धर्मादिक निमित्तांची काय गरज? तर धर्मादिक निमित्त प्रकृतिवरील आवरणांचा नाश करते. याला द्दष्टान्त शेतक-याचा आहे.  जसा शेतकरी पाणी वाहण्याच्या मार्गातील अ़डथळे  दूर करतो पण पाणी मात्र त्याच्या वाहण्याच्या धर्मानेच शेतकरी ज्या ज्या  आळ्यांत (खाचरांत) ते पाणी नेईल तिकडे जाते. तसे धर्मादिक हे प्रकृतीला परिणामासाठी प्रेरक नसुन ते फक्त आवरण दूर करतात. व प्रकृती स्वभावतःच जात्यन्तर परिणामाला पावते. धर्माचे आवरण निघून जसे प्रकृतिचे शुद्ध परिणाम होतात त्याचप्रमाणे अधर्माने प्रकृतिचे अशुद्ध परिणाम होतात. म्हणजेच वाईट जन्म मिळतो.

                निर्माणचित्तान्यस्मितामात्रात् ।।४।।
    योग्याने निर्माण केलेल्या अनेक शरीरांसाठी  अस्मितेच्या योगानेच अनेक चित्ते उत्पन्न होतात. 'योगिनः चित्तानि मूलकारणादस्मिमात्रादेव युगपत्परिणमन्ति।'

              प्रवृत्तिभेदे प्रयोजकं चित्तमेकनेकेषाम्।।५।।
    वेगवेगळ्या शरीरांतील चित्तांना कार्यांत प्रवृत्त करणारे असे एकच  अधिष्ठातृरूपाने असलेले  योग्याचे चित्त प्रेकर असते. एकच चित्त योगमायेमुळे निर्माण केलेल्या अनेक शरीरातील चित्तांना प्रेरक होते.  'तेषामनेकेषां चेतसां व्यापारनानात्व एकं योगिनश्चित्तं प्रेरकमधिष्ठातृत्वेन । तेन न भिन्नमतत्वम्। यथा == त्मीय शरीरे मनश्चक्षुः पाण्यादीनि यथेच्छं प्रेरयति अधिष्ठातृत्वेन तथा कायान्तरेष्वपि ।' 
   
        तत्र ध्यानजमनाशयम् ।।६।।
 इच्छा निर्मित अनेक चित्तांना प्रेरक असे अधिष्ठातृत्व  रूपनाने असलेले योग्याचे चित्त त्यास ध्यानज चित्त म्हणतात. त्या चित्ताला  रागादि प्रवृत्ती नसल्यामुळे ते कर्म वासनारहित असते.
  
          कर्माशुक्लाकृष्णं योगिनस्त्रिविधमितरेषाम् ।।७।।
    कर्माच्या चार जाती आहेत: शुक्लकर्म, कृष्णकर्म, शुक्लकृष्णकर्म, अशुक्ल अकृष्णकर्म. योग्यांचे अशुक्ल  अकृष्णकर्म असते. सर्व कर्मांच्या फलांचा त्याग केला असल्यामुळे त्यांचे कर्म अशुक्ल व कोणताही भावी परिणाम होत नसल्याने ते कर्म कशाचेही उपादन कारण नसते म्हणून अकृष्ण कर्म असते. इतरांची कर्मे बाकी तीन प्रकारची असतात. शुभ फल देणारेजे कर्म त्यास शुक्ल कर्म म्हणतात. दान, तप स्वाध्यादि कर्म करणा-या परूषांचे शुक्लकर्म असते त्यापासून शुभ फल प्राप्त होते. पापाचरणी पुरूषांचे कृष्णकर्म असते त्य़ापासून नरकलोक  प्राप्त होतो.  काहींची काही चांगली व काही वाईट कर्मे असतात. त्य़ापासून मिश्र फळ मिळते.  
योगसूत्र कैवल्यपाद
    ततस्तव्दिपाकानुगुणानामेवाभिव्यक्तिभिव्यक्तिर्वासनानाम् ।।८।।
    शुक्ल, कृष्ण व शुक्लकृष्ण या तीन प्रकारच्या कर्मांचा विपाक (फल देणय्याची प्रवृत्ती) त्या विपाकाला योग्य अशा ज्या वासना त्या वासनांची अभिव्यक्ति होते. 'यज्जातीयस्य कर्मणो यो विपाकस्तुस्यानुगुणा या वासनाः कर्मविपाकमनुशेरते तासामेवाभिव्यक्तिः।'

            जातिदेशकालव्यवहितानामप्यानन्तर्यं स्मृतिसंस्कारयोरेकरूपत्वात् ।।९।।
      जीव हा एका योनीतून दुस-या योनीत अशा  रीतीने नाना योनींत जरी भ्रमण करीत असला व नाना प्रकारच्या जातीत जन्म घेणे , वेगवेगळ्या देशांत व कालांत जन्माला येणे असे एक जन्म व दुसरा जन्म यांत जातिदेशकाल यांचे जरी व्यवधान असले तरी स्मृती व संस्कार एकरूप असल्याने फलानुसंधानाचे नैरन्तर्य राहाते. ज्याप्रमाणे वासनासंस्कार  असतील  त्याप्रमाणे  स्मृतीसंस्कार  उत्पन्न होऊन  कर्म घडते. त्यांचे संस्कार  पुनः पुनः  चित्तावर राहतात. असा स्मृतीसंस्काराचा  अखंडितपणा. स्मृतीची  व्याख्या 'संस्कार मात्र जन्यं ज्ञानं स्मृतिः । संस्काराची व्याख्या ,'संस्कारो हि नाम गुणाधानेन भवति दोषापनयनेन वा।' (शंकराचार्य) शिवाय 'अनुभवजन्यास्मृतिहेतुर्भावना। आत्ममात्रवृत्तिः । असे भावनेचे वर्णन तर्कसंग्रहात आहे. यावरून स्मृती संस्कार एकरूप असून त्यांचा अखण्डितपणा कधीच तुटत नाही व कोणत्याही जातिदेश कालाच्या व्यवधाने तो बाधित होत नाही , तर योग्य वेळी स्मृतिसंस्करा उदय पावून कर्म घडते व तदनुरूप फलप्राप्ती होते.
   
                           तासामनादित्वमाशिषो नित्यत्वात् ।।१०।।
      स्मृतिसंस्काररूपाने असणा-या ज्या वासना  त्या अनादि आहेत. कारण इच्छा ही नित्य असते. मी नेहमी सुखी असावे , सुखापासून  माझा वियोग होऊ नये ही इच्छा नित्य  असते, 'आशिषो नित्यच्वात्= ये यमाशीर्महामोहरूपा सदैव सुख साधनानि मे भूयासुर्मा कदाचन तैर्मे वियोगोभूदित यः संकल्पविशेषो वासनानां कारणं तस्यनित्यत्वात्; अनुभवसंस्काराद्यनुविद्धं संकोचविकाशधर्मि चित्तं तत्तदभिव्यञ्ञक विपाक लाभात् तत्तत्फलरूपतया परिणमते।'

                 हेतुफलाश्रयालम्बनैः संगृहीतत्वादेषामभावे तदभावः ।।११।।
      वासनांचा संग्रह कसा होतो व त्यांचा अभाव कसा होतो, त्या नाहिशा कशा होतात हे या सूत्राने  स्पष्ट करतात. अविद्या हा हेतू; विशिष्ट शरीर, स्मृती संस्कार हे फल ; बुद्धीसत्त्व हे आश्रय व विशिष्ट शब्द , स्पर्श, रूप, रस, गन्धादिक भोग हे  आलम्बन यामुळे वासनांचा संग्रह होतो. अविद्यादिक हेतु स्मृती संस्कार फळ, बुद्धिसत्त्व आश्रय व बाह्य भोग हे आलम्बन या सर्वांचा अभाव झाला असतां अभाव होतो.'मनस्तु साधिकारमाश्रयो वासनानाम्। नह्यवसिताधिकारे मनसि निराश्रया वासनाः स्थातुमुत्सहन्ते। यदभिमुखी भूतं वस्तु यां वासनां व्यनक्ति  तस्यास्तदालम्बनम् ।  एवं हेतु फलाश्रयालम्बनैरेतैः संगृहीताः सर्वा वासनाः। एषाणभावे तत्संश्रयाणामिपि वासनानामभावः।' जेव्हा मन भोगाच्या कार्यांत प्रवृत्त असेल तेव्हा ते वासनांना आश्रय असते. जेव्हाते कशातही प्रवृत्त नसेल तेव्हा आश्रय नसलेल्या  मनाचा अवलम्ब वासना करू शकत नाही. प्रवृत्त झालेले मन ज्या  वस्तुकडे धाव  घेईल त्या संबंधीची वासना त्या मनात राहिल. या रीतीने सर्व वासना हेतुफलाश्रयालम्बन यांच्या आधारानेच राहतात. या चौघांचा अभाव असला  तर तदनुष्ठित वासनांचाही अभाव असतो.

                   अतीतानगतं स्वरूपतो=स्तत्यध्वभेदाध्दर्माणाम्।।१२।।
      धर्माणां वासनानां परिणामो=ध्वभेदादतीतरूपेणा=स्ति। अनागत रूपेणवा=स्ति स्वरूपतो=स्ति।'
वासनांचे तीन मार्ग कल्पिले आहेत. काही वासना अनुभूत विषयामुळे अतीत (स्वव्यापारोपरत) होतात. काही वासना भविष्यकाळी योग्य सामग्रीने अभिव्यक्त होणा-या असतात त्या अनागत वासना. काही वासना स्वव्यापारोपारूढ म्हणजेच 'स्वरूपतः असणे' अशा असतात या तीन मार्गानी वासनांचे अस्तित्व असतेच.
 
           ते व्यक्तसूक्ष्मा गुणात्मानः ।।१३।।
    ते वासनांचे वर्तमान स्थितीत व्यक्त असतात व अतीत आणि अनागत स्थितीत सूक्ष्म रूपाने असतात. ह्या सर्व वासना व त्यांचे व्यक्ताव्यक्त धर्म सत्त्वरजतम गुणांचेच प्रगट स्वरूप असल्याने वास्तविकरित्या या वासना व त्यांचे धर्म गुणस्वरूपच असतात. 'सर्वमिदं गुणांना संविशेष विशेषमात्रमिति परमार्थतो वासनातद्धर्माणाम्।'

      
             परिणामैकत्वाव्दस्तुतत्तवम् ।।१४।।
     प्रख्या ,क्रिया, स्थिती असे जे सत्त्व , रज व तम गुण आहेत त्यांचा करणरूप व ग्राह्यरूप असा एकच (सारखा) परिणाम दिसतो. जसे श्रोत्र हे इंद्रिय, शब्द हा विषय व आकाश हे स्थुल स्वरूप ;त्वक् हे इन्द्रिय, स्पर्श हा विषय व वायु हे स्थूलस्वरूप; चक्षु हे इन्द्रिय, रूप हा विषय व तेज हे स्थूल स्वरूप; जिह्व हे इन्द्रिय, रस हा विषय व आप हे स्थूल स्वरूप; घ्राण हे इन्द्रिय, गन्ध हा विषय, पृथ्वि हे स्थुल स्वरूप. अशा रीतीने प्रकृतिपासून होणा-या या परिणामाची एकरूपता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या सर्व परिणामाला वस्तुतत्त्वता आहे. It has objectivity and at the same time objective vaildity. परिणामला वस्तुसत्यता असल्यामुळे प्रकृतिचा जो भूत, भौतिक पसारा आहे तो सत्य आहे. या सूत्रांत पतज्जली मुनींनी सांख्यांचा सत्कार्यवाद एवं सत्ख्यातिवाद यांचा अंगीकार केला आहे व विज्ञानास्तित्ववादि आणि शून्यवादी या बौद्धांच्या मतांचे खंडन केले आहे. विज्ञानवादी बौद्धांची प्रक्रिया अशी आहे. ' विज्ञानवादिबौद्धानाम् आत्मख्यातिः। बुद्धिरेव रजतरूपेणावभासते। न तत्र विषयान्तरापेक्षा। प्रयोगश्च, विमतं रजंतं बुद्धिरूपं, चक्षुरादि संप्रयोगमन्तरेणापरोक्षत्वात्संमतबुद्धिवदिति विज्ञानवादिनो बौद्धाः।' शून्यवादि बौद्धांची प्रक्रिया अशी-
'शून्यवादी बौद्धानामसत्ख्य़ातिः । असत् ख्यातिर्नाम असतो रजतादेः ख्यातिः प्रतीतिरिति शून्य वादिनो बौद्धः।' विज्ञानवादी व शून्यवादी बौद्धांच्या मते बाह्य वस्तुंना सत्य अस्तित्वच नाही व विज्ञानवादी बौद्ध संस्कारएकत्व असल्यामुळे बुद्धिचाच बाह्य वस्तुच्या रूपाने अविर्भाव होतो असे मानतात. तथापि 'परिणामाला  वस्तुतत्त्व आहे', 'It has objectivity and objedtive validity '   असे सांगून सांख्यवादी यांचे खण्डन करतात.

                           वस्तुसाम्ये चित्तभेदात्तयोर्विभक्तः पन्थाः ।।१५।।
     बाह्य वस्तु एका चित्ताचा परिणाम नाही किंवा  अनेक चित्त परिकल्पित म्हणूनही तिला अस्तित्व नाही तर बाह्य वस्तुस स्वप्रतिष्ठेमुळे अस्तित्व आहे. व स्वप्रतिष्ठेमुळे तिच्यात साम्य आहे म्हणजे ती सर्वांना सारखी दिसते. वस्तुस जरी स्वप्रतिष्ठा आहे(objectivity and objective validity) तरी चित्तामध्ये असलेल्या विविध संस्कारामुळे त्या वस्तुपासून कोणास सुख होते, कोणास दुःख होते तर कोणी उदासीन राहातो. असे जे वस्तुमुळे निरनिराळे पन्थ (आघात) चित्तावर होतात ते चित्ताच्या विविध वासनाधर्मामुळे होतात.
योगसूत्र कैवल्यपाद
    
              न चैकचित्ततन्त्रं वस्तु तदप्रमाणकं तदा किं स्यात्।।१६।।
    वस्तुची प्रतिष्ठा कोणत्याही एका चित्ततन्त्रावर कधीच नसते. जर चित्तावर वस्तुची प्रतिष्ठा अवलंबून असेल तर जेव्हा चित्त अन्यत्र व्यग्र असेल अगर  समाधिअवस्थेत निरूद्ध असेल अगर मूर्च्छावस्थेत त्याच्या स्वभावांत नसेल तर त्या चित्ताच्या नसण्यामुळे ती वस्तु अप्रमाण होणार आहे का? याचे उत्तर 'मुळीच नाही असे  आहे. वस्तुंची सत्यता (असणेपणा) चित्ताच्या तन्त्रावर नसुन स्वप्रतिष्ठेवर आहे. 'स्वतन्त्रो=र्थः सर्वपुरूषसाधारणः स्वतंत्राणि च चित्तानि प्रतिपुरूषं प्रवर्तन्ते। तयोः संबंधादुपलब्धि पुरूषस्य भोग इति।'

              तदुपरागापेक्षित्वाच्चित्तस्य वस्तु ज्ञाताज्ञातम्।।१७।।
      उपरागः =आकार समर्पणम् । जी बाह्य वस्तु आहे तदाकार चित्त होणे ही अपेक्षा वस्तुंचे ज्ञान होण्याला असते. जर चित्त तदाकार झाले नाही तर ती वस्तु अज्ञात राहाते. याचा अर्थ  असा, वस्तुशी जर चित्ताचा इन्द्रिय प्रणालीने संबंध आला नाही तर चित्ताला आघात करील तेव्हाचित्त  तदाकार होते व मग चित्ताला त्या वस्तुचे ज्ञान होते. 'तस्यार्थस्योपरागादाकारसमर्पणाच्चित्ते बाह्यं वस्तु ज्ञातमज्ञातम भवति। व्यक्तिरिक्तस्यार्थास्य सम्बन्धाभावादग्रहीतुमशक्यत्वात्। ततश्च येनेवार्थोनास्य ज्ञानस्य स्वरूपोपरागः कृतस्तमेवार्थं ज्ञान व्यव्हारयोग्यातां नयति । ततश्च सो=र्थो ज्ञात इत्युच्युते । येन चा=कारो न समर्पितः स न ज्ञातत्वेन व्यवहि्यते।' 
   योगसूत्र कैवल्यपाद
     सदा ज्ञाताश्चित्तवृत्तयस्तत्प्रभोः पुरूषस्य़ापरिणामित्वात् ।।१८।।
        जसे चित्त बाह्य वस्तुच्या आकाराने परिणाम पावते तसा पुरूष हा परिणाम पावत नाही. पुरूष हा अपरिणामी असल्याने त्या पुरूषाला चित्तवृत्ति ह्या नेहमी ज्ञात असतात. चैतन्यस्वरूप पुरूष हा नेहमी अधिष्ठाता आहे. त्यामुळे चित्तवृत्तिचे त्याला नेहमी ज्ञात होते.

             न तत्स्वाभासं दृश्यत्वात् ।।१९।।
    ते चित्त स्वतःच प्रकाशित करू शकत नाही ते चित्त पुरूषाकडून जाणले जाते कारण ते चित्त देखील इन्द्रिय व वस्तुप्रमाणे जड अत एव दृश्य आहे. 'तच्चित्तं स्वप्रकाशकं न भवति। पुरूषवेद्यं भवति दृश्यत्वात् घटवत्। दृश्यं च चित्तं तस्मान्न स्वप्रकाशकम्।'

         एकसमये चोभयानवधारणम् ।।२०।।
    या सूत्राने क्षणिकवादी बौद्धांचे खण्डन केले आहे. बौद्धांच्या मते चित्त ज्या क्षणी वस्तुच्या आकाराचे होण्याच्या क्रियेत असते त्याच क्षणी ते पूर्णवस्तुच्या आकाराचे होते व त्याच क्षणांत ते आपणास प्रकाशित करते.म्हणजे क्रिया, ,क्रियाफल व क्रियेचे कारकत्व 'स्वःला प्रकाशित करणे' ह्या तिन्हीही गोष्टी एकाच क्षणाला होतात असे त्यांचे मत आहे. 'क्षणिक वादिनो यभ्दवनं सैव क्रिया तदेव च कारकत्वम् ।तथा चोक्तं वैनाशिकैः भूतिर्य़षां क्रियासैव कारकं सैवचोच्यचे।'
            या बौद्ध प्रक्रियेला वरील सूत्राने उत्तर देतात, 'चित्त ज्यावेळी वस्तुच्या आकाराचे  होते त्याच वेळी ते स्वतःला प्रकाशित करू शकत नाही. हे दोन्ही  व्यापार भिन्न असल्यामुळे एकाच क्षणाला ते होऊ शकणार नाहीत.
      अर्थाला जाणणे म्हणजे सुखदुःखरूप हेतूच्या व्यव्हाराला योग्य असे त्यांचे ज्ञान करून घेणे आणि बुद्धिचे तदाकार परिणत होणे  ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी विरोधी व्यापारामुळे संभवत नाहीत.

          चित्तान्तदृश्ये बुद्धिबुद्धेरतिप्रसग्ङः स्मृतिसंकरश्च ।।२१।।
    दृश्य जे चित्त त्या चित्ताला जाणणारा अपरिणामी पुरूष आहे असे  न मानता निराळे चित्तच 'वस्तू आकार परिणाम पावणा-या' प्रथमचित्ताला जाणते किंवा बुद्धिला जाणणारी एक निराळी बुद्धिच आहे असे मानले तर अतिप्रसंग म्हणजे अनवस्था प्रसंग होईल. 'अनेक चित्त व अनेक बुद्धी मानाव्या म्हणजे लागतील व स्मृतींचा संकर होईल.'संसेकारमात्रजन्यं ज्ञानं स्मृतिः' अशी स्मृतिची व्याख्या आहे. चित्ताला अगर बुद्धिला ग्रहण करणारे दुसरे अशा रितीने अनेक चित्त किंवा अनेक बुद्धी मानल्या तर त्या  प्रत्येकावरील असंख्य संस्कार एकाच वेळी उत्पन्न झाली याचे ज्ञान न झाल्यामुळे स्मृतींचा संकर होईल.

           चितेरप्रतिसंक्रमायास्तदाकारापत्तौ स्वबुद्धीसंवेदनम्।।२२।।
  
पुरूष हा चैतन्यस्वरूप आहे त्यासच 'चित्त शक्ती' म्हणतात. ही अप्रतिसंक्रमा आहे. अप्रतिसंक्रमा म्हणजे जी परिणाम पावत नाही अशी 'न विद्यते प्रतिसंक्रमो=न्यत्र गमनं यस्याः सा। अन्येनासंकीर्ण।' बुद्धी ही ग्राह्याकार होते व तशी ग्राह्याकार झालेली  बुद्धी जेव्हा चैतन्य संलग्न होते. त्यावेळी चैतन्यशक्तिने बुद्धी वृत्तिकार स्वरूपाची चितशक्तिला जाणीव करून देते. म्हणजे स्वप्रतिष्ठिता। तत्सन्निधाने यदा बुद्धिश्चेतनेवोपजायते तदा चिच्छक्तिबीद्धित्तिविशिष्टतया संवेद्यते। तदनंतरं बुद्धेः स्वस्या==त्मनो वेदनं भवतीत्यर्थः।'

                   द्रष्ट्टद्दश्योपरक्तं चित्तं सर्वार्थम् ।।२३।।
 चित्त हे द्रष्टा जो पुरूष त्याच्याशी उपरक्त असते तेव्हा ते पुरूषाकार होते तसेच ते दृश्याला ग्रासणारे म्हणजे दृश्याकार होणारे आहे. म्हणून चित्त हे सर्वात्मक होऊ शकते. जे ग्रहण  करण्याची इच्छा चित्तास होईल, तदाकार चित्त होते. म्हणून चित्तांत सर्वार्थ ग्रहण करण्याची  शक्ति आहे.

                 तदसंख्येवासनाभिश्चित्रमपि परार्थं संहत्यकारित्वात् ।।२४।।
     'सहंत्यकारित्वं नाम मिलित्वा=र्थक्रियाकारित्वम्।' संहत्यकारित्व म्हणजे एकत्र मिळून क्रिया करण्याची शक्ति. चित्त हे असंख्य नानाप्रकारच्या वासनांनी  चित्रविचित्र स्वरूपाचे  जरी असले तरी  ते दुस-यासाठी  आहे. सुखरूप चित्त अथवा ज्ञानरूप चित्त अनुक्रमे पुरूषाच्या भोगासाठी व मोक्षासाठी आहे. 'संहत्यकारिणां चित्तेन न स्वार्थन भवितव्यं न सुखचित्तं सुखार्थं न ज्ञानं ज्ञानार्थमुयमप्येतत्पुरूषार्थम्।' जसे नाना प्रकारच्या वस्तुंच्या संहतिमुळे , एकत्र येऊन उपयोगी पडण्यामुळे बनलेले घर हे त्याच्या स्वतःसाठी नसून दुस-यासाठी  (त्या घरांत राहणा-या पुरूषासाठी) असते, त्याचप्रमाणे चित्त हे पुरूषासाठी असते.

     विशेषदर्शिन आत्मभावभावना निवृत्तिः ।।२५।।
   पूरूषाचा चित्ताशी संयोग असल्यामुळे मा कर्ता, मी ज्ञाता या अज्ञानामुळे पूरूष हा मी भोक्तृ असा अभिमान बाळगतो. जेव्हा मी चित्ताहून अगदी भिन्न आहे असे विशेष 'निःसन्दिग्ध बाळगतो. जेव्हा मी चित्ताच्या अगदी भिन्न आहे असे विशेष 'निःसन्दिग्ध' दर्शन पुरूषास होईल त्यावेळी पूरूषाची आत्मभावना (स्वभावना) निवृत्त होईल. आत्मभावभावना म्हणजे मी कर्ता, मी ज्ञाता, मी भोक्ता असा अभिमान. चित्त पुरूषाहून वेगळे आहे. हे विशेष दर्शनदेखील जेव्हा होते त्यावेळी 'निःसंगोह्ययम् पुरूषः।' असे निःसंगत्वच केवळ उरते . हेच कैवल्य सत्स्वरूप ज्ञानाची  पराकाष्ठारूप जी भावना ती देखील कैवल्यांनंतर नाहिशी होते.

       तदा विवेकनिम्नं कैवल्यप्राग्भारं चित्तम् ।।२६।।
    जेव्हा विशेषदर्शी योग्याची आत्मभावभावना नाहिशी होते तेव्हा त्याचे चित्त विवेकाने (पुरूषापासुन दृश्य, चित्त वगैरे अगदी भिन्न आहे या  विवेकाने ) नम्र झालेले एवं कैवल्याच्या ओघाने (भराने) भारलेले असते.

       तच्छिद्रेषु प्रत्ययान्तरणि संस्कारेभ्यः ।।२७।।
     जरी चित्त कैवल्याच्या ओघाने भारलेले असते तरी मधून-मधून त्या  ओघात पूर्वीचे संस्कार असल्यामुळे काही अन्तराळ (पोकळ जागा अगर मधला वेळ) राहतात व त्या ओघात क्वचित खंड पडतो. हीच त्या समाधी अवस्थेतील छिद्रे आहेत. या मधल्या वेळात पूर्वसंस्कारापासून व्युत्थानाकडे नेणा-या अन्य जाणीव (अनुभव अथवा कल्पना) उत्पन्न होतात.

              हानमेषां क्लेशवदुक्तम् ।।२८।।
    मधून मधून हे जे अन्य प्रत्यय (अनुभव) संस्कारामुळे उत्पन्न होतात, यांचादेखील त्याग करावयास पाहिजे. जसे ध्यानाने क्लेशांचे हान (त्याग) करावयाचे असते तसेच ध्यानाने प्रत्ययान्तराचे देखील हान करावे . सूत्र २.३ मधे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे पाच क्लेश म्हणून सांगितले व सूत्र २.११मधे क्लेश वृत्तिंचे हान करावे असे सूचित केले. त्याचप्रमाणे संस्कारापासून उत्पन्न होणारी जी प्रत्ययान्तरे आहेत, त्यांचेही हान (त्याग) ध्यानाने करावे.

         प्रसंख्याने=प्यकुसीदस्य सर्वथा विवेकख्यातेधर्मर्ममेघः समाधिः ।।२९।।
      'प्रसंख्यानं यावतां तत्त्वानां यथाक्रमं व्यवस्थितानां परस्परविलक्षणस्वरूप विभावनम्।' जेवढी तत्त्व आहेत त्या सर्वांचे यथाक्रम व त्यांच्या एकमेकाहून भिन्न स्वरूपाचे योग्य ज्ञान होणे यास प्रसंख्यान म्हणतात. 
       अकुसीद= पलाकाक्ष्ङा न बाळगणारा, विरक्त. अशुक्ल कर्म जास्त आहेत असे धर्म. ही धर्माची सर्वांत उत्कृष्टावस्था. हे  धर्म परमपुरूषार्थाचा म्हणजेच ' कैवल्याचा' वर्षाव करतात. असा वर्षाव ज्या अवस्थेत होतो त्यास धर्ममेघ समाधी म्हणतात. यथाक्रम सर्व तत्त्वांचे ज्ञान झाले असता सुद्धा जो फलाकाक्ष्ङारहित असतो अशा योग्याला विवेक ज्ञानामुळे धर्ममेघनामक समाधिचा सहज निवृत्ती होते.
 
          तदा सर्वावरणमलापेतस्य ज्ञानस्या==नन्त्याज्ज्ञेयमल्पम् ।।३१।।
       क्लेशकर्म निवृत्ती झाल्यावर सर्व आवरणरूपी मल (क्लेश व कर्म यांचे संस्कार) नाहिसे होऊन अनन्त ज्ञान प्रगट होते व त्या ज्ञानापुढे ज्ञेय अत्यन्त अल्प वाटते.  हे सूत्र पतज्जलीचे वाटत नाही व क्षिप्त (Interpolated) वाटते. हे सूत्र कोणत्याही  अर्थाचा बोध करीत नाही. अत एव अर्थशून्य आहे. वास्तविक सूत्र ४.३० व सूत्र ४.३२ मिळून 'ततःक्लेशकर्मनिवृत्तिः कृतार्थानां परिणाम क्रमसमाप्तिर्गुणानाम्' असे एक सूत्र पूर्ण अर्थाचा बोध करणारे होते पण सूत्र पुन्हा एकदा 'ततः हा एक शब्द घालूनया  एका सूत्राची दोन सूत्र करून मधेच ४.३१ हे सूत्र घुसविले आहे. असे प्रस्तुत लेखकाचे म्हणणे आहे.
         सूत्र ४.३१ मधे पुढील  प्रमाणे दोष आहेत. ज्ञेयाचेच ज्ञान होत असल्याने ज्ञेय अल्प व ज्ञान विभू असे कधीच होणार नाही. ज्ञेय व ज्ञान यांची व्याप्ती सारखी असेल. पण ज्ञेय हे मात्र कधीच अल्प होणार नाही. जसे 'प्रमेयत्व' (समजणेपणा) व अभिधेयत्व ( शब्दाने संबोधणेपणा) यांची व्याप्ती सारखीच आहे तशीच ज्ञेय  व ज्ञान यांची सारखी व्याप्ती आहे. ज्ञेय असेल तर ज्ञान होईल म्हणून ज्ञेयाला 'अल्पत्व' देणे हा प्रथम दोष दुसरा म्हणजे सर्व आवरणरूपी मल नाहिसे झाल्यावर ज्ञानाचे आन्नत्य प्रकट होत नसून सूत्र २.२४ 'तस्य हेतुरविद्या' मधे जे अविद्येचे प्रतिपादनकेले ती अविद्या नाहिशी होऊन सूत्र२.२५ 'तद
भावत्संयोगाभावो हानं दृशेः कैवल्यम्' मधे अविद्येच्या अभावामुळे जी कैवल्य प्राप्ती होते. याचा परिणाम म्हणजे हा दुसरा दोष . सूत्र ४.३१ या दोन दोषांनी युक्त आहे व आतापर्यन्त पतज्जलीने एकही दोषयुक्त सूत्र रचिले नाही म्हणून हे सूत्र क्षिप्त (
Interpolated) वाटते.
          या सूत्राचा अर्थच लावायचा तर तो असा लावता येईल की संसारावस्थेत ज्ञान अल्प असून ज्ञेय हे विभू आहे. पुरूष जीवदशेत असता सर्व ज्ञेयाचे ज्ञान जीवाला अशक्यच. पण जेव्हा जीव पुरूषदशेला जातो, अर्थात् मूळ प्रकृतिपासून आपणाला भिन्न जाणतो तेव्हा 'प्रकृतिं पश्यति पुरूषः प्रेक्षकवदास्थितः स्वच्छः।। या कारिकेनुसार निर्मळ असा पुरूष भोगापवर्गरूपप्रसवशून्य अशा प्रकृतिस अशा प्रकृतिस पाहतो व त्या पूर्णज्ञानसंपन्न पुरूषास ज्ञेय जी प्रकृती  ती अल्प म्हणजेच तुच्छ वाटते व त्यामुळे प्रकृतिचा सहज उपरम होतो.

       ततः कृतार्थानां परिणाम क्रमसमाप्तिर्गुणानाम् ।।३२।।
           सर्व क्लेश व कर्मरूप मलाचे आवरण नाहिसे झाल्यावर पूरूषाला अपवर्गरूप अर्थाची प्राप्ती झाल्यामुळे सत्त्व, रज व तम हे गुण कृतार्थ होतात.
      त्यांना पूरूषाला अधिक काही साधून द्यावयाचे राहात नाही म्हणून त्या गुणांच्या परिणामक्रमाची समाप्ती होते. त्या गुणांचा अन्य भोगरूपी परिणाम होत नाही. परिणामक्रमाची समाप्ती होते. त्या गुणांचा अन्य भोगरूपी परिणाम होत नाही. परिणामक्रमसमाप्ति म्हणजे काय हे सूत्र ४.३३ ने स्पष्ट करतात.

               क्षण प्रतियोगी परिणामापरान्तिर्ग्राह्यः क्रमः ।।३३।।
     क्रमाची दोन लक्षणे आहेत. एकतर क्रम हा क्षणयोगी आहे व दुसरे  लक्षण म्हणजे परिणामाचा जो शेवट त्याने क्रम कळतो. एका क्षणाला क्रम होत नाही. क्रम होण्यास क्षणांचा समूह ( एक क्षण, दुसरा क्षण, तिसरा क्षण असा समूह) लागतो. म्हणून या क्षण समूहाला क्षणाचा प्रतियोगी म्हटले आहे. परिणाम क्रमः क्षणप्रतियोगी क्षणः प्रतिसम्बन्धी यस्य सः । क्षणप्रचयाश्रय इत्यर्थः न चैकस्यै व क्षणस्यक्रमः। तस्मात् क्षणप्रचयाश्रयःक्रमः । 'क्रमपरिणामाचा जो शेवट तो यामुळे जाणला जातो. प्रत्येक क्षणाला परिणाम बदलत जातो. कापसापासून तन्तु, तन्तुपासून पट ,पटापासूनपरत तन्तु , असा हा परिणामक्रम सारखा क्षणाक्षणाला चालु आहे.  हा गुणांचा परिणामक्रम ज्या योग्यास 'पुरूष प्रकृतिहून अगदी वेगळा आहे' असा विवेक झाला आहे त्याच्यासाठी होत नाही . कारण त्या योग्यासंबंधी गुणांची कृतार्थता झाली असते. क्लेश कर्मांचा संस्कार व वासना यांनी रहित असे विवेकज्ञान ज्या योग्यास प्राप्त झाले आहे  त्या योग्यासाठी गुणांचा परिणामक्रम न होता प्रतिप्रसव होतो. म्हणजे कार्य कारणांत लीन पावते व पुरूषास कैवल्यप्राप्ती म्हणजे स्वरूपप्रतिष्ठा प्राप्त होते हे शेवटच्या सूत्राने सांगतात.
       
         पूरूषार्थशून्यानां गुणानां प्रतिप्रसवः कैवल्यस्वरूप प्रतिष्ठा वा चितिशक्तिरिति ।।३४।।
      ज्या सत्त्व, रज, तम गुणांचे पुरूषासाठी भोग तथा अपवर्गरूप संपूर्ण कार्य झाले आहे असे जे कार्यरूपाने असणारे गुण त्यांचा प्रतिप्रसव होतो. म्हणजे ते कारणांत लीन पावतात. 'प्रतिप्रसवः - स्वकारणे प्रधाने लयस्तेषां कार्यकारणात्मकांनां गुणानाम्।'  हा जो गुणांचा प्रतिप्रसव  यासच कैवल्य म्हणतात. 'यो=यं गुणांना कार्यकारमात्मकांना प्रतिसर्गस्तत्कैवल्यम्।' प्रधानाने वरीलप्रमाणे पुरूषाशी संबंध सोडला की तोच पूरूषाचा मोक्ष . यासच स्वरूप प्रतिष्ठा अथवा चितिशक्ति ही नावे आहेत.

                 येथे पातज्जल योगसूत्राचा चतुर्थाध्यास समाप्त झाला
                   तसेच पातज्जल योगसूत्र  समग्र समाप्त झाले.

                           ।। ऊँ शुभं भवतु ।।
 --------------------------------------------------------------------------