मंगलवार, 24 अप्रैल 2018

कृष्णसखा अर्जुन


कृष्णसखा अर्जुन
माघीपंचमी अर्थात् सरस्वती पूजनका दिवस (26-01-2023)
आजके लिये मेरी गीता-प्रस्तुति -- कृष्ण-सखा अर्जुन (मराठी)
महाभारत हा या जगातील सर्वात मोठा व सर्वश्रेष्ठ ग्रंथ, सर्वात मोठे काव्य, सर्वात मोठे तत्वज्ञान आणि सर्वात मोठा इतिहास असे वर्णन करता येईल. यात अनेक नायक आहेत –प्रत्येकाचे नायकत्व निराळे. कित्येक खलनायक आहेत- त्यांचे खलनायकी दुर्गुणही निराळे.
अर्जुन हा असाच एक नायक. महाधनुर्धर, धैर्यवान, इंद्रपुत्र, नर या श्रेष्ठ मुनिंचा अवतार, असे त्याचे विविध तऱ्हेने वर्णन करता येईल. महाभारतातील पात्रांपैकी सर्वाधिक देश हिंडलेला असाही अर्जुन. तरी त्याचे कृष्णसखा हेच वर्णन सर्वोत्तम वाटते. कृष्णाचेही जे काही रुप महाभारतात प्रकट झाले आहे त्या सर्वांमधे अर्जुनसखा हेच वर्णन कृष्णालाही सर्वोत्तम लागू पडते असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
महाभारतातील माझ्या सर्वांत आवडीचे व्यक्तिमत्व म्हणजे अर्जुन. त्याच्यात दुर्गुणांचा लवलेशही नव्हता असे म्हणता येणार नाही. पण त्याचे सद्गुण उच्च कोटीचे होते.
अगोदर आपण अर्जुनाचा जीवनवृत्तांत थोडक्यात पाहू या.
हस्तिनापुरीचा राजा पाण्डु ऋषींच्या शापाने लज्जित आणि निराश होऊन राज्याचा त्याग करुन आपल्या दोन्ही राण्या कुंती आणि माद्री यांच्यासह वनवासात राहू लागतो. मैथुनात असलेल्या हरीणरुपधारी ऋषींना मारल्यामुळे तो ही मैथुनाचा प्रयत्न केल्यास मरण पावेल असा तो शाप असतो. हस्तिनापुरीत त्याचा मोठा अंध भाऊ धृतराष्ट्र राजा होतो. त्याला शंभर मुले होतात - हेच ते दुर्योधनादि कौरव. पाण्डु देखील नियोग पद्धतीने दुसऱ्या योग्य व्यक्तीकडून आपल्या पत्नीस संतती प्राप्त व्हावी असा विचार करतो. तेव्हा त्याला कुंतीला मिळालेल्या अद्भुत वरदानाची हकीकत समजते. तिच्या मंत्रशक्तिने कोणत्याही देवतेस आव्हान केल्यास त्या देवतेपासून संतानप्राप्ति होईल असा तो वर असतो. याचा प्रयोग करून ती अनुक्रमे धर्म, वायु व इंद्र या देवतांना आव्हान करते व तिला युधिष्ठिर, भीम, अर्जुन हे पुत्र प्राप्त होतात. याच मंत्राचा प्रयोग करुन माद्रीला देखील अश्विनकुमारांकडून नकुल व सहदेव असे पुत्र प्राप्त होतात. हे सर्व पाण्डुपुत्र म्हणूनच पाण्डव. त्यांची एकी हेच त्यांचे सामर्थ्य.
पाण्डु व इंद्र दोघेही उत्कृष्ठ धर्नुधर आणि सामर्थ्यवान. ते कौशल्य अर्जुनाला सहजच लाभते. वनवासात पाण्डुने एका तपोनिष्ठ पण धनुर्विद्येत पारंगत अशा राजर्षिकडून पाण्डवांना शस्त्रास्त्र-शिक्षण व मुनींकरवी वेदशास्त्रांचे शिक्षण देवविले असते. त्यांचे चरित्र निर्माण होईल असे प्रयत्न केलेले असतात असे महाभारतकारांनी आवर्जून स्पष्ट केले आहे. असे प्रयत्न धृतराष्ट्रपुत्रांसाठी झालेले नसतात.
पुढे पाण्डु व माद्रीचा मृत्यू होतो आणि कुंती पाचही पुत्रांसह हस्तिनापुरी येते. तेथे पितामह भीष्म सर्व एकशेपाच राजपुत्रांच्या शिक्षणासाठी अगोदर कृपाचार्य व नंतर महाधनुर्विद्यासंपन्न अशा गुरु द्रोणांची नियुक्ति करतात. त्या सर्व कुमारांमधे अर्जुन हाच सर्वांत उठून दिसतो कारण त्याचे हस्तलाघव, लक्ष्यभेदाची एकाग्रता, गुरुभक्ति इत्यादि. अगदी जे ब्रम्हास्त्र फक्त स्वत:चा पुत्र अश्वत्थामा यालाच द्यावे असे वाटत असते तेही अर्जुनाच्या सावधगिरिमुळे त्यालाही शिकविणे द्रोणांना भाग पडते.
कुंतीला ऋषी दुर्वासांच्या वरदानामुळे कुमार वयातच सूर्याकडून कर्ण हा पुत्र मिळालेला असतो. त्याच्याकडे जन्मत:च अक्षय कवच- कुंडले असतात, तसेच तोही उत्तम धनुर्धर होत असतो. मात्र जन्मत:च कुंतीने टाकून दिले असल्याने तो अधिरथ या धृतराष्ट्राच्या सारथ्याकडे वाढलेला असतो. साहाजिकच त्याच्या जीवनाचे एकच उद्दिष्ट ठरून जाते- ते म्हणजे स्वत:ला अर्जुनापेक्षा वरचढ सिद्ध करणे. त्याचे शौर्य, कौशल्य व अर्जुनाविषयीचा मत्सर हे ओळखून दुर्योधन त्याला अंगदेशाचे राजेपद बहाल करुन त्याला आपल्या बाजूने वळवतो. सर्वत्र श्रेष्ठ म्हणून गाजलेला हा धनुर्धर. इतका की त्याच्या पुढे अर्जुनाचा पाडाव लागेल ही खात्री प्रत्यक्ष युधिष्ठिरालादेखील वाटत नसे. तरी प्रत्यक्ष युध्द प्रसंगात मात्र कित्येकदा अर्जुनच वरचढ ठरलेला आपण बघतो त्याचे कारण ही मत्सर भावनाच असावी असे मला वाटते. व म्हणूनच अर्जुन हे पात्र मला अधिक प्रिय वाटते.
द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा देण्याची वेळ येते. बालमित्र द्रुपदाने अपमान केलेला असतो म्हणून त्याला पकडून, बंदी बनवून आणावे अशी आज्ञा ते करतात. प्रथम कर्णाला घेऊन सर्व कौरव जातात पण द्रुपद सेना त्याचा पराभव करते. त्यानंतर अर्जुनासकट पाचही पाण्डव जातात व द्रुपदाला बंदी करतात. द्रोण त्याचे अर्धे राज्य ठेवून घेतात. या अपमानाने क्षुब्ध होऊन द्रोणाचा वध करेल अशा पुत्राची इच्छा ठेऊन द्रुपद एक महायज्ञ करतो. त्यातील अग्नीवेदीमधून त्याला धृष्टद्युम्न हा पुत्र आणि द्रौपदी ही पुत्री प्राप्त होते. अशी ही अग्निकन्या द्रौपदी.
इकडे हस्तिनापुरीत वेगळेच कपट घडते. युधिष्ठिराच्या एकूण योग्यतेमुळे, तो वयाने मोठा असल्यामुळे, तसेच दुर्योधनाला प्रजेची पसंती मिळणार नाही या जाणिवेमुळे धृतराष्ट्र युधिष्ठिराला युवराज घोषित करतो. त्यानंतर प्रजेमधे युधिष्ठिराची लोकप्रियता वाढतच जाते. दुर्योधन व त्याचबरोबर धृतराष्ट्राचाही मत्सर वाढू लागतो. मग धृतराष्ट्र पाण्डवांना फिरुन या असे सांगत कुंतीसह वारणावत नगरीत पाठवतो. तिथे त्यांच्या स्वागतासाठी आधीच महाल उभारुन ठेवलेला असतो व तो लाख इत्यादी ज्वलनशील पदार्थांनी बनवलेला असतो . हे कपट ओळखून पाण्डव त्यात एक भुयार खणतात व महालाला स्वत:च पेटवून देऊन भुयारी मार्गाने सुखरूप बाहेर निघतात. पाण्डव जळून मेल्याची वार्ता सगळीकडे पोहचते व पाण्डवांनाही प्रकट झाल्यास धोका आहे समजून ते गुप्तरुपानेच वावरतात.
द्रुपदाची इच्छा असते की द्रौपदीचा विवाह अर्जुनाशी व्हावा. म्हणून तो स्वयंवरासाठी अत्यंत कठीण पण जाहीर करतो. एका स्तंभावर गरगर फिरणारा लाकडी मासा व त्याचे खालच्या स्वच्छ पाण्यांत पडणारे प्रतिबिंब. एका अवजड धनुष्याला बाण लावून खालील प्रतिबिंबात बघून त्या लाकडी माश्याच्या डोळ्याचा वेध घ्यायचा हा तो पण. यदाकदाचित अर्जुन जिवंत असेल तर गाजावाजा केलेल्या स्वयंवरासाठी तो येईल व पण जिंकेल असे द्रुपदाचे गणित असते.
आणि तसेच होते. ब्राम्हण वेशात फिरणारे पाण्डव हा पण ऐकतात, व स्वयंवरसभेत येतात. तिथे आलेले सर्व राजे एकापठोपाठ एक अपयशी ठरु लागतात, तर कर्ण हा सूतपुत्र असल्याने मी त्याला वरणार नाही असे द्रौपदी आधीच सांगून टाकते. जमलेल्या राजांमधे कृष्ण मात्र आपला अभिन्न सखा अर्जुनाला ओळखतो व स्वत: पण जिंकण्यासाठी पुढे येत नाही. मग ब्राम्हणवेशातील अर्जुन पण जिंकतो, तेव्हा रागाने सर्व राजे एकत्र येऊन त्याच्यावर चाल करुन जातात. तेव्हाही कृष्ण-बलराम तटस्थच राहतात व भीम आणि अर्जुन सर्व राजांचा पराभव करतात. त्यानंतर अत्यंत नाट्यमय रीतिने द्रौपदीचा विवाह पाच पाण्डवांबरोबर होतो. याला कुंती, कृष्ण व व्यास असे तिघेही कारणीभूत व सल्लागार असतात. त्यामुळे हा विवाह समाजमान्यही होतो.
द्रौपदीमुळे पाण्डवांची एकी भंग पाऊ नये यासाठी नारद त्यांना एक काटेकोर नियम घालून देतात.
अशा प्रकारे पाण्डवांचे सामर्थ्य एकाएकी वाढल्यानंतर मात्र कलह टाळण्याच्या दृष्टीने धृतराष्ट्र त्यांना अर्धे राज्य देऊन इंद्रप्रस्थ म्हणजे सध्याच्या दिल्लीला पाठवतो. हा अविकसित भूप्रदेश असतो, पण प्रत्यक्ष इंद्र येऊन विश्वकर्मा या शिल्पतज्ज्ञाच्या आखण्यानुसार या नगरीची रचना केली म्हणून हिचे नाव इंद्रप्रस्थ. इथे युधिष्ठिर आपल्या प्रशासकीय कौशल्याने व नीतिधर्मामुळे राज्याची अभूतपूर्व भरभराट करतो. मात्र याच काळात नारदाने घालून दिलेला नियम अर्जुनाकडून मोडला गेल्याने त्याला बारा वर्षे देशाटनाला जावे लागते. या काळात अर्जुन उत्तर, पूर्वोत्तरेकडील मणिपूर, अंग, द्रविड, मलय, प्रभास, द्वारका आदि ठिकाणी फिरतो. एका अर्थी संपूर्ण भारतभ्रमणच.
या काळात तो आर्या, उलूपी, चित्रगंदा व सुभद्रा अशा चार राजकन्यांशी विवाह करतो. त्यामधे कृष्णाच्या अनुमतीने त्याची बहीण सुभद्रा सोबत केलेला विवाह देखील आहे.
अर्जुन परत आल्यावर कृष्णार्जुनाच्या साहाय्याने अग्नि खांडव वनाचा स्वाहाकार करतो. या प्रसंगी तिथल्या एका सर्पराज तक्षकाला वाचवण्यासाठी इंद्र स्वत: येऊन अर्जुनासोबत लढाई करतो पण अर्जुनाच्या पराक्रमुळे फिका पडून निघून जातो. मात्र खांडववनातील मय हा दानव अर्जुनालाच शरण आल्यामुळे त्याचे प्राण वाचतात. मय देखील उत्कृष्ठ शिल्पतज्ज्ञ असतो व पाण्डवांना अत्यंत अद्भुत अशी मयसभा बांधून देतो. त्याचवेळी भीमासाठी एक उत्कृष्ठ गदा देतो. अग्निदेखील अर्जुनाला एक दिव्य रथ, गांडीव धनुष्य व अक्षय भाता देतो.
यानंतर राजसूय यज्ञासाठी कृष्णाचा सल्ला घेतात तेव्हा जरासंधाच्या वधासाठी केवळ भीम, अर्जुन व मी स्वत: एवढेच समर्थ आहोत असे कृष्ण सांगतो. त्याप्रमाणे ब्राम्हणवेशात जाऊन जरासंधाला द्वंद्व युद्धाचे आव्हान देतात, व भीम-जरासंधाचे मल्लयुद्ध होऊन त्यात भीम जरासंधाचा वध करतो.
यानंतर राजसूय यज्ञाआधी दिग्विजय आवश्यक म्हणून अर्जुन उत्तर दिशेला निघतो. त्या दिशेने तो कैलास मानसरोवर, गंधर्व प्रदेश, चीन, किरात, काश्मीर व त्यांच्याही कितितरी उत्तरेला जाऊन बाह्लीक व ईशान्य देशातील प्रदेश जिंकतो. याखेरीज तो हरिवर्ष नावाच्या अशाही प्रदेशात जातो जिथे मर्त्य मानवाला प्रवेश नाही. तरी पण तिथले नगररक्षक त्याच्या शौर्य सामर्थ्यामुळे त्याला खंडणी आणून देतात. या युध्दात तो विभिन्न जातींचे, कधी पोपटी तर कधी मोरपंखी रंग असणारे घोडे जिंकतो.
राजसूय यज्ञानंतर धृतराष्ट्राची आज्ञा मोडायची नाही म्हणून निव्वळ क्रीडा व मनोरंजनासाठी मांडलेले द्यूत खेळायचा निर्णय युधिष्ठिर घेतो. पण कपटी शकुनीला तो क्रीडा म्हणून खेळायचा नसून पाण्डवांचे राज्य वैभव जिंकून घेऊन त्यांना अपमानित करायचे होते. म्हणूनच शकुनी आपल्या फाशांची भुरळ युधिष्ठिरावर टाकत गेला आणि युधिष्ठिर लागोपाठ हरत हरत आपल्या चारही बंधुना, स्वत:ला आणि नंतर द्रौपदीलाही पणाला लावून बसला. त्या प्रसंगी युधिष्ठिरावर चिडलेल्या भीमाला अर्जुनानेच शांत केले. दुर्योधनाने चिथावणी देत विचारले की जर हे चार पाण्डव किंवा त्यापैकी कोणीही म्हणत असतील की युधिष्ठिर आम्हांला पणाला लावू शकत नाही, तर मी त्या सर्वाना दास्यत्वातून मुक्त करीन. हे पाण्डवांची एकी भंग करण्याचे कपटच होते व द्रौपदीचा अपमान आणि वस्त्रहरण हेही द्रौपदीसोबत पाण्डवांनाही नामोहरम करण्यासाठी होते. तरीही चारही भावांपैकी कोणीही युधिष्ठिराविरोधात गेले नाहीत. पुढे धृतराष्ट्रच पाण्डवांची आणि द्रौपदीची सुटका करतो पण पुन्हा एकदा वेगळ्या शर्तीवर द्यूत खेळण्यास भाग पाडतो. या वेळी पाण्डवांनी बारा वर्षे वनांत आणि एक वर्ष अज्ञातवासात रहावे असा पण असतो. ही खेळी देखील हरल्यामुळे पाण्डवांना वनवासात जावे लागते.
वनवासात खूपदा चर्चा होते की द्यूतातील पण तोडून तेरा वर्षांआधीच राज्य परत मिळविण्याचे प्रयत्न व्हावेत. परंतु युधिष्ठिराला काळजी असते की संपत्ती व शस्त्रसाठ्याशिवाय युध्द कसे जिंकणार? यावर उपाय म्हणून त्याला गुरु सल्ला देतात की वृत्रसुर-संग्राम प्रसंगी इंद्राकडे जमा झालेला शस्त्रसाठा अर्जुनाने मिळवावा, तसेच दिव्यास्त्रांचे ज्ञान प्राप्त करुन घ्यावे. यासाठी अर्जुनाला “प्रतिस्मृतीविद्या” नामक विशिष्ट विद्या देखील शिकवण्यात आली. अशा प्रकारे पुन दुसऱ्यांदा अर्जुनाचा एकाकी प्रवास सुरु होतो.
या प्रवासात त्याला वारंवार तो नर-नारायण या ऋषीजोडीपैकी नर हा ऋषी होता व आताच्या जन्मात नारायण हा कृष्ण रुपाने वावरत आहे याची जाणीव करून देण्यांत येते. किरातवनातील शंकराबरोबर त्याचे युध्द होऊन शंकर त्याच्या कौशल्यावर खूष होऊन त्याला कित्येक अस्त्रांचे ज्ञान देतो. त्यानंतर इंद्र, यम, वरुण आणि कुबेरही प्रकट होऊन त्याला आपापल्या दिव्यास्त्रांचे ज्ञान देतात. त्याच्यासाठी इंद्राचा खास रथ येऊन त्याला स्वर्गात नेले जाते. तिथे तो शस्त्रसाठा मिळवतो. शिवाय एक वर्षभर गंधर्वाकडून नृत्य आणि संगीताचे शिक्षण घेतो. मग इंद्र त्याला समुद्रीद्वीपात रहाणाऱ्या, मायावी युध्द करणाऱ्या आणि वरदानांमुळे देवांना अजिंक्य असणाऱ्या निवातकवच नावाच्या दैत्यसमूहाशी युध्द करण्यास पाठवतो. निवातकवचांचा निःपात करुन परतीच्या वाटेवर तो कालकेय या अंतरिक्षात वावरणाऱ्या दैत्यसमूहांचाही निःपात करतो. अशा रीतिने पाच वर्षे शस्त्रास्त्रसाधना करुन अधिक प्रभावशाली होऊन तो परत येतो.
यानंतर पाण्डवांचा अज्ञातवास सुरु होतो तेंव्हा विराटराजाच्या दरबारी प्रत्येक जण काही ना काही नोकरी पत्करतात. तेव्हा अर्जुन स्त्रीरुप घेऊन अंत:पुरातील राजकन्यांना नृत्य वादनाचे धडे देऊ लागतो. भीमाकडून विराटाचा शालक जो कीचक, त्याचा वध झाल्यावर दुर्योधनाला संशय येतो की हे भीमाचेच काम असावे, अणि अज्ञातवासातील पाण्डव विराटाच्या राज्यात असावेत. त्याचा मित्र त्रिगर्तराज एका बाजूने विराटावर आक्रमण करतो व सर्व सैन्य तिकडे गेल्याची खात्री पटल्यावर दुसऱ्या बाजुने दुर्योधनाचे आक्रमण होते. त्यावेळी एकटा अर्जुन त्यांच्यासोबत युध्द करुन भीष्म, द्रोण, कर्णासह सर्वांना मोहिनी अस्त्राने मूर्च्छित करुन विराटाचे गोधन वाचवतो.
असा हा कौशल्यसंपन्न, विद्यासंपन्न, कलासंपन्न अर्जुन. पण कौरव पाण्डवांमधील युध्दाचा दिवस उजाडतो आणि दोन्ही सैन्याचे निरीक्षण करण्यासाठी मध्यावर आलेला अर्जुन मात्र गांगरतो. दोन्ही सैन्यात आपलेच नातेवाईक, बंधु-बांधव, सखा-मित्र, पुत्र-पौत्र असलेले पाहून त्याची विवेकबुद्धी भ्रमित होते.यांच्याशी लढून सर्व क्षत्रियांचा नाश करुन राज्य मिळवायचे ते कुणासाठी ! एवढा नरसंहार तोही स्वजनांचा, का करायचा हा त्याला प्रश्न पडतो.
अशा वेळी अर्जुनाचा सखा आणि सारथी असलेला कृष्ण त्याला धर्माचे मर्म समजावून सांगतो. समोर युद्ध ठाकलेले असताना आणि ते अधार्मिक शत्रूच्या आततायीपणामुळे ठाकलेले असतांना ठाम उभे राहून युद्ध करणे हाच धर्म. आप्तसंबंधी असणे एका बाजूला आणि आततायी अधार्मिक असणे दुसऱ्या बाजूला. म्हणूनच कृष्णाचे पहिले शब्द असतात – हे कश्मल तुला का आले? हे क्लैव्य सोड. हे अनार्य आहे, अकीर्तीकर आहे, अस्वर्ग्य आहे.
पण अर्जुन पुन्हा तेच घोळवतो – गुरु आहेत, बांधव आहेत – जे धार्तराष्ट्र आहेत त्यांना आम्ही जिंकू की नाही हेही माहीत नाही, पण त्यांना मारून आम्ही जगू शकत नाही असे मला वाटते.
पण एवढ बोलून अर्जुनाला कृष्णाचे शब्द आठवतात – कश्मल, क्लैव्य------! त्याला आपले वैगुण पटकन लक्षात येते व तो कबूल करुन मोकळा होतो – हा माझा कार्पण्यदोष आहे-दुबळेपणा आहे. मी धर्मसंमूढ झालो आहे – धर्माबाबत मला कळेनासे झाले आहे. मी शिष्यभावनेने शरण आलो आहे – जे निश्चितपणे श्रेयस्कर आहे ते तू मला सांग.
पण कृष्ण लगेच नाही सांगत की ऊठ आणि लढ. स्वजनांना मारल्याने मला शोक होईल तो स्वर्गाच राज्य मिळाल तरी जाणार नाही अस म्हणणाऱ्या अर्जुनाला तो सर्वात आधी आत्म्याच्या अमरत्वाचा दाखला देतो. न हन्यते हन्यमाने शरीरे अस सांगतो. जन्माला येणारा मृत्यु टाळू शकत नाही आणि मरणारा पुनर्जन्म टाळू शकत नाही. या दोन्ही सैन्यांमधे जमलेल्या सर्वांना एक ना एक दिवस मृत्यु येणारच. आणि कपडे बदलावे त्याप्रमाणे त्यांचे आत्मे आताचे शरीर टाकून दुसरे शरीर घेतील. कारण आत्मा अविनाशी आहे आणि देह हा विनाशी. तेव्हा अर्जुना, तू नाशवान देहांसाठी शोकाकुल न होता आत्म्याच अविनाशित्व ध्यानात घे.
पण याचा अर्थ असा होत नाही की आत्मा अमर आहे म्हणून तू युद्ध सोडून द्यावेस. या जन्मीचा तुझा स्वभाव हाच तुझा धर्म आणि तो क्षत्रिय स्वभाव – तो धर्म आहे लढण्याचा. म्हणूनच आता प्राप्त झालेले हे युद्ध न लढशील तर स्वधर्म आणि कीर्ति दोन्हीं घालवून बसशील आणि पापाचा भागी होशील. म्हणून ऊठ आणि युद्धाचा निश्चय करुनच ऊठ. युद्ध जिंकू किंवा न जिंकू हे माहीत नसूनही ऊठ कारण कर्म करणे हा धर्म आहे पण कर्मफल प्राप्त करणे हा धर्माचा नियम नाही. म्हणूनच कर्मफलाकडे स्थितप्रज्ञतेने पहायला शिक, पण कर्म मात्र पूर्ण कौशल्य पणाला लावून कर. कर्मात कुशलता, चित्तात समदर्शिता आणि बुद्धीत स्थितप्रज्ञता हाच योग आहे, आणि अर्जुना, तू ही योगी हो. त्यासाठी कर्मकुशलता दाखव आणि युद्धात उत्तम लढून विजय मिळव. हेच कृष्णाच्या गीतेचे सार.
कुणी कुणी विचारतात – दोन्हीकडील सैन्य युद्धासाठी तयार आणि आतुर असताना कृष्ण एवढी मोठी अठरा अध्यायांची गीता कशी सांगत बसेल? पण मला वाटते की धर्मसंमूढ झालेल्या अर्जुनाला तिथल्या तिथे धर्म काय ते कळायला हवे होते. माझे श्रेय निश्चित कशात आहे हे सांग म्हणणाऱ्या अर्जुनाला निव्वळ ऊठ आणि लढ एवढे पुरले नसते, तर आल्या प्रसंगी युद्ध करणे हा धर्म कसा ठरतो हे पण पटवून देणे आवश्यक होते. गतासून म्हणजे घडून गेलेला आणि अगतासून म्हणजे पुढे कधीतरी घडणारे या दोन्हींबद्दल शोक न करता , प्राप्त परीस्थितीत स्वभावधर्माप्रमाणे वागणे हाच धर्म हे अर्जुनाला पटवून दिले नसते तर तो सर्व कौशल्य पणाला लावू शकला नसता. अगदी कृष्णाचे विश्वरुप पाहून व त्यापाठोपाठ त्याचे चतुर्भुज असे नारायणरुप पाहूनही पुढे अर्जुनाचे प्रश्न लगेच संपलेले नाहीत, हे आपण गीतेत बघतो. अशा अर्जुनाला युद्धासाठी तत्पर करायचे असेल तर कृष्णाचा उपदेश त्याच्या मनावर पूर्णपणे ठसायला हवा. त्याच्या तोंडून उत्स्फूर्त निघाले पाहिजे – नष्टो मोहः स्मृतिर्लब्धः
असे हे एका सख्याने सख्याला सांगितलेले तत्वज्ञान. अनोखा असा जिव्हाळा असल्याखेरीज सांगणारा सांगू शकत नाही. अर्जुनाच्या मनातले संपूर्ण कश्मल, संपूर्ण कार्पण्यता काढून टाकण्यासाठी तो जिव्हाळा, ते सख्यत्व आणि एवढे मोठे विवेचन या तिन्हींची गरज होतीच.
महाभारतातील वर्णनाप्रमाणे कृष्ण आणि अर्जुनाची प्रथम नजर भेट घडते ती द्रौपदी स्वयंवराच्या वेळी. द्रौपदी सारख्या अद्वितीय सुंदरीच्या स्वयंवरात भाग घेण्यासाठी येणाऱ्या कृष्णाने, स्वत: धनुर्विद्येत पटाईत असतांना व लक्षभेदाचे कौशल्य असतानाही त्यासाठी प्रयत्न न करण्याचे कारण काय? तर ब्राम्हणवेशातील अर्जुनाला त्याने ओळखले म्हणून. आधीपासूनच अर्जुनाविषयी सखाभाव असल्याशिवाय या वागण्याला दुसरे कारण दिसत नाही. कुंभाराच्या घरी कुंतीच्या भेटीसाठी कृष्ण – बलराम जातात तेव्हा कृष्ण धर्म व भीमाला नमस्कार करतो, नकुल सहदेवांना आशीर्वाद देतो पण अर्जुनाला मात्र अलिंगन देतो. यावरून त्यांचे आधीपासूनच सख्यत्व असले पाहिजे हे दिसून येते.
विवाहसोहळ्यानंतर पाण्डवांचे सामर्थ्य वाढते. धृतराष्ट्राला त्यांना अर्धे राज्य देणे भाग पडते. खाण्डवप्रस्थाची वनाच्छादित, मनुष्यवस्ती न झालेली जागा पाण्डवांना मिळते. त्यावेळी नवीन नगरी उभारण्यासाठी त्यांना कृष्णाचे सर्वतोपरी सहाय्य मिळते. मग होतो अर्जुनाचा वनप्रवास. त्याही वेळी तो द्वारकेत आल्यावर व सुभद्रेशी विवाह करण्याची इच्छा झाल्यावर कृष्णाच्या मदतीने सुभद्राहरण करतो. त्यानिमित्त कृष्ण पुन्हा काही काळ खाण्डवप्रस्थात वास्तव्य करतो. तेव्हा कृष्णार्जुनाच्या सख्यत्वाला खरी झळाळी चढते. दोघे मिळून खाण्डववनाचा दाह घडवून आणतात. त्यासाठी एकत्रपणे इंद्रालाही अडवतात.
त्यानंतर द्यूतात हरलेल्या व बारा वर्षे वनात राहणाऱ्या पाण्डवांना कृष्ण वेळोवेळी मदत करतो व शेवटी दुर्योधनाच्या आततायीपणामुळे युद्धाला तोंड लागते तेव्हा अर्जुनाचे सारथ्य पत्कारतो. महाभारत युद्धाचे वर्णन वाचताना आपल्याला जाणवते की सुरवातीचे गीतेच्या माध्यमातून केलेल तत्वज्ञान अर्जुनासाठी होतेच पण त्या अठरा दिवसांत क्षणोक्षणी अर्जुनाला योग्य सल्ला, त्याचे रक्षण इत्यादी कृष्ण करीतच होता. अर्जुनाच्या रथावर कोसळणारी विविध अभिमंत्रित अस्त्रे निष्प्रभ नाही केली तरी त्याने ती थोपवून धरली होती व युद्धसमाप्तिनंतरच त्यांच्या प्रभावाने अर्जुनाचा रथ जळून नष्ट झाला. भीम, द्रोण व कर्ण यांच्यावरही निर्णायक वार करण्याच्या प्रसंगी अर्जुनाचा संभ्रम कृष्णामुळेच दूर झाला होता.
महाभारत ग्रंथानुसार कृष्ण व अर्जुन यांच्या जीवनाचा अंत मात्र अगदी भिन्नपणाने होतो. महाभारत युद्धात पृथ्वीतलावर इतर बहुतेक सर्व राजे मारले गेले तरी यदुवंशी राजपुत्र मात्र लढाईत भाग न घेतल्याने वाचलेले असतात. आता ते निर्बंधरहीत होऊन एकामेकांतच लढू लागतात. त्यांना थांबवणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर बलराम तीर्थयात्रेला व कृष्ण शेजारील वनांत निघून जातात. तिथेच एका व्याधाचा विषयुक्त बाण कृष्णाच्या पायाला लागतो. आपला मृत्यु जवळ आलेला पाहून व यदुवंशाचाही नाश झालेला ओळखून कृष्ण आपला पिता वसुदेव याला निरोप देतो की अर्जुनाला बोलवा. माझा नातू अनिरुद्ध याचा मुलगा वज्र हा इंद्रप्रस्थावर राज्य करील व सर्व यदुवंशी स्त्रिया हस्तिनापुरात पाण्डवांच्या आश्रयाने राहतील. एवंच मृत्युसमयी मात्र कृष्णार्जुनाची भेट किंवा संवाद होत नाहीत. कृष्णाला त्याचे स्मरण मात्र असते.
यदुकुल स्त्रियांना घेऊन जातांना अर्जुनावर रस्त्यातील टोळ्यांचा हल्ला होतो तेव्हा एरवी दर युद्धात विजयी होणारा अर्जुन संपूर्णपणे निष्प्रभ झाल्याचे वर्णन आपण ऐकतो. जणू त्याचे स्वत्वच कृष्णासोबत निघून गेल्यासारखे.
पुढे बराच काळ राज्य करुन पाण्डव स्वर्गारोहणासाठी जातात. त्या वाटेवरुन सदेह स्वर्गलोकी तोच जाऊ शकेल ज्याने विशुद्धपणे जीवन व्यतीत केले असेल. त्या वाटेवर अर्जुन कोसळतो व भीम याचे कारण विचारतो तेव्हा धर्म सांगतो की याला धनुर्विद्येचा अहंकार असल्याने हा स्वर्गात जाऊ शकला नाही.
अशी ही अर्जुन कथा. त्याच्या व कृष्णाच्या सख्यातून उद्भवलेली भगवद्गीता समस्त भारतीय ग्रंथशास्त्रांचा प्राण म्हणून ओळखली जाते एवढे त्याचे श्रेष्ठत्व. नर - नारायण यांचा अवतार म्हटले जाणाऱ्या कृष्ण व अर्जुनाची ही कथा आपल्याला त्यांच्या अवतार वृत्तीची जणू प्रचीतीच मिळवून देते. म्हणूनच की काय, आजही बद्रीनारायण येथील नर–नारायणांचा आश्रम हे भारतीयांचे एक श्रद्धास्थान बनून राहिले आहे.