गुरुवार, 14 जनवरी 2016

****** बुद्धियोगाचे तत्वज्ञ -- डॉ. बलराम सदाशिव अग्निहोत्री

बुद्धियोगाचे तत्वज्ञान शिकवणारे माझे वडील डॉ. बलराम सदाशिव अग्निहोत्री
ज्ञानेश्वर त्रैमासिकासाठी लेख
(संस्कृत व तत्वज्ञानाचे ज्येष्ठ व गाढे अभ्यासक, प्राध्यापक बुद्धीयोगी आणि ज्योतीष या विषयाचे तज्ञ डॉ. बी. एस्. अग्निहोत्री यांचे १५ फेब्रुवारी ०६ रोजी दुःखद निधन झाले. ज्ञानेश्वर त्रैमासीकासाठी त्यांनी अनेक विषयांवर लेखन केलेले आहे. संपादक मंडळ त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. डॉ. अग्निहोत्री यांना विनम्र श्रद्धांजली- संपादक)
संस्कृत व तत्वज्ञानाचे प्रगाढ अभ्यासक आणि चिंतनशील वक्ते व लेखक डॉ. बळीरामदादा अग्निहोत्री हे जळगाव पंचक्रोशीतील एक सन्माननीय व्यक्तीमत्व होते. आकाशवाणी जळगावच्या श्रोत्यांनी पुराण व उपनिषदांवर त्यांची स्फुट संभाषणे ऐकली आहेत. पंचक्रोशीतील लोक त्यांना उत्तम ज्योतिषी म्हणून ओळखत होते. माघ शुद्ध पौर्णिमा, सोमवार, दिनांक १३ फेब्रुवारी २००६ रोजी ब्राम्ह मुहुर्तावर पहाटे ३ वाजता त्यांचे निधन झाले. त्यामुळे सामान्य माणसांना अडीअडचणींवर ज्योतिषदृष्ट्या सल्ला मिळू शकणारे हक्काचे स्थान व छत्र हरपले. त्यांना ही श्रद्धांजली.
माझे वडील डॉ. बळीराम सदाशिव अग्निहोत्री यांचा जन्म १९१६ साली कार्तिक शुद्ध प्रतिपदेला धारणगांव, जिल्हा जळगांव येथे झाला. शालेय शिक्षण पी.आर हायस्कूल, धरणगांव व कॉलेजशिक्षण एच्.पी.टी कॉलेज, नाशिक येथे झाल्यानंतर त्यांनी एस्.पी. कॉलेज पुणे मधून संस्कृत विषयात व एच्.पी.टी कॉलेज नाशिक मधून तत्वज्ञान विषयात M.A केले. त्यानंतर लोणावळा येथील कैवल्यधाम संस्थेत स्वामी कुवलयानंद यांचा सहवास लाभला व या संस्थेची शिष्यवृत्ती घेऊन त्यांनी मुंबई विद्यापिठामार्फत विल्सन कॉलेजचे प्रो. वेलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट संपादन केली. त्यांचा विषय होता Investigation of Yoga and its Implications found in Vedic literature. या काळात ते कैवल्यधाम येथील विद्यार्थ्यांना योग तत्वज्ञान शिकवत, तर स्वतःचे अष्टांग योगाचे म्हणजेच आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा इत्यादीचे धडे घेत. याच काळात त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला.
त्यानंतर व्यारा (गुजरात) व खांडवा (मध्यप्रदेश) येथे अल्पकाळ अध्यापकाची नोकरी करून डॉ. अग्निहोत्री जबलपूर हितकारणी कॉलेज, जबलपूर येथे १९५६ साली तत्वज्ञानचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. तीनच वर्षांनंतर बिहार शासनाच्या शिक्षण खात्याअंतर्गत मिथिला संस्कृत रिसर्च इन्स्टिट्यूट येथे प्राध्यापक पदावर रूजू झाले. १९५९ ते १९७५ असा प्रदीर्घ काळ विद्यार्थ्यांना संस्कृत, तत्वज्ञान शिकवणे व रीसर्च साठी गाइडन्स देणे हे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. या कालावधीत त्यांनी कित्येक ओरीएन्टल कॉन्फरन्सेच्या जर्नल्ससाठी लेखन केले. त्यांच्या हाताखाली सतरा विद्यार्थ्यांना डॉक्टरेट मिळाली. याच काळात त्यांचे कादंबरी कथासार हे त्रैभाषिक पुस्तक- संस्कृत, इंग्रजी व हिंदी - हे चौखम्बा प्रकाशन, वाराणसी यांनी प्रकाशित केले. कॉलेज विद्यार्थ्यांना उपयुक्त असे या पुस्तकाचे स्वरूप होते.
त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरूवात लोणावळा येथेच झाली. १९४८ मध्ये देवरूख येथील लीला नामजोशी यांचेशी त्यांचा विवाह झाला. विवाह समयी मॅट्रिक असलेल्या माझ्या आईने पुढील पाच वर्षात बाहेरून अभ्यास करून BA ची डिग्री पटकावली. कालान्तराने तिने MA देखील पार पाडले.  दोघांनी मिळून आपल्या मुलांना सुसंस्कारीत आणि विद्यासंपन्न केले आज मी IAS असून महाराष्ट्र प्रशासनाच्या प्रधान सचिव पदावर आहे. याचे श्रेय आई व दादांनाच जाते. शिवाय चिंतनपर लेखनाची गोडी मला त्यांच्यामुळेच लागली. त्यांची दुसरी मुलगी- माझी धाकटी बहीण डॉ. छाया कोरडे या प्रख्यात डॉक्टर आहेत आणि मुलगा डॉ. सतीश अग्निहोत्री हे देखील IAS असून ओरीसा सरकाच्या सचिव पदावर आहेत. डॉ.सतीश अग्निहोत्री यांनी स्त्री-पुरूष सांख्यिकी समतोल, स्त्री विरोधी मासिकता व अनुषांगित प्रश्न अशा गहन प्रश्नांवर अभ्यास करून डॉक्टरेट मिळवली असून डॉ.अमर्त्य सेन सारख्या जगप्रसिद्ध अर्थतज्ञांकडून नावाजले गेले आहेत. त्यांच्या पत्नि अनिता देखील IAS असून शिवाय बंगाली भाषेतील लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. या आम्हां सर्वांच्या यशामध्ये दादा व आईंचा फार मोठा वाटा आहे.
आमच्यावर संस्कार घडवतांना दादांनी शिक्षणाबरोबरच चौफेर वाचन व भ्रमण यांचीही गोडी लावली. ते स्वतः भारतभर फिरले होते व पुढे इंग्लंड येथे सहा महीने राहून येण्याचा योगही त्यांना लाभला. बिहार सारख्या लांबच्या प्रांतात येणा-या इतर कित्येक महाराष्ट्रीय व दक्षिण भारतीय कुटुंबाना त्यांचे मार्गदर्शन व मैत्री मिळाली. त्यांचा मोठा जिव्हळा होता. ज्योतिष्याच्या व्यासंगामुळे देखील दरभंगा महाराजा व इतर बरेच विद्वन व उच्चपदस्थ अधिकारी यांचे येणे जाणे चालू असायचे. तसेच दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत धरणगावी परत येऊन थेही विद्वनाच्या गाठी भेटी व चर्चा होत असत.
डॉ.बळीराम अग्निहोत्री यांचे वडील अर्थात माझे अजोबा धरणगावी माळी समाजाच्या आग्रहावरून दर एकादशीला कीर्तन करीत. ती परंपरा दादांनी कायम ठेवली. १९६० ते १९९६ अशी तब्बल ३६ वर्षे धरणगांव येथे महीनाभर त्यांचे भगवद्गीता, ज्ञानेश्वरी व भागवत धर्म यावर प्रवचन होत असे.
१९७७ मध्ये महाराष्ट्रात परतल्यावर त्यांनी एक वर्ष दापोली येथे नोकरी केली. त्यानंतर धरणगांव व पुणे येथे वास्तव्य केले. या दरम्यान त्यांची सहा नातवंडे वारंवार कमी अधीक काळ त्यांच्या जवळ रहात.
२००१ नंतर त्यांचे कायम वास्तव्य पुण्यातच राहिले. तेंव्हा वयाच्या पंच्याऐशीव्या वर्षी देखील त्यांची प्रकृति ठणठणीत व बुद्धी कुशाग्र होती. इंजिनियरींगच्या शिक्षणासाठी दोन नातवंडांना आपल्याकडे ठेन घेण्यात त्यांना कुठलाच त्रास वाटला नाही. याच काळात त्यांनी पातंजल योगसूत्र, सांख्यकारिका व योगत्रयी (कठ, श्वेताश्वतर व मांडुक्य उपनिषदांचे तौलनिक विवेचन) ही संस्कृत- मराठी द्वैभाषिक पुस्तके लिहून प्रकाशित केली. B.A M.A च्या संस्कृतच्या विद्यार्थ्यांना सुलभतेने या विषयांचे आकलन होण्याच्या दृष्टीने ही पुस्तके लिहीली. त्यानंतर "बुद्धियोग , दि एक्झिबिटरी सरमन्स ऑफ भगवद्गीता" हे त्रैभाषीक - संस्कृत, इंग्रजी, हिंदी दीर्घ- विवेचनात्मक पुस्तक लिहून प्रकाशित केले. नैषध चरित्रसार या पुस्तकावरील भाष्य देखील पूर्ण केले ते प्रकाशनाधीन आहे. त्यानंतर आपल्या खणीत आवाजात शुद्ध व स्पष्ट उच्चारांसह संपूर्ण भगवद्गीतेचे रेकॉर्डींग केले. त्याची ऑडीओ कॅसेट व ऑडीओ सीडी देखील पुढे काढण्यात आली, तिचे प्रकाशन आस्था व संस्कार चॅनलवर झाले. धरणगांवच्या वास्तव्यात आकाशवाणी जळगावने देखील उपनिद व पुराणावरील त्यांची व्याख्याने प्रसारित केली आहेत.
याशिवाय दादांनी धरणगांव ते पंढरपूर दोन वर्ष पायी वारी केली. भागवत धर्म व कृष्णावर त्यांची परमश्रद्धा होती. भगवद्गीता व अनेक स्त्रोत्रे व ग्रंथ त्यांना तोंडपाठ तर होते व दैनंदिन चर्चेत सहजगत्या त्यांतील संकल्पनांचा ते वापर करीत असत. विषेशतः 'विना मेहनतीचे धन घेऊ नका' या ईशावास्योपनिषदातील वचनावर त्यांची दृढ श्रद्धा होती. ज्योतिष्याच्या आधारे भविष्य सांगताना व्यवहारातील सत्य आणि प्रयत्न यांच्याकडे दुर्लक्ष करू नका असे त्यांचे सतत सांगणे असे. या सर्व चिंतनाला ते भगवद्गीतेचा दाखला देत असत.
खाणे आणि खिलवणे याची त्यांना फार आवड होती. ते स्वतः उत्कृष्ठ स्वयंपाक करीत. सुटीच्या दिवशी दुपारी स्वयंपाक-घराचा ताबा घेऊन गोडधोड पदार्थ बनवणे व सर्वांना आग्रहाने खाऊ घालणे हा त्यांचा आवडीचा छंद होता. तसेच विभिन्न भाषा विषेशतः त्यांचे व्याकरण शिकण्याची हौस होती. ग्रीक, लॅटीन, जर्मन, फ्रेंच भाषांची व्याकरण व भाषा या विषयांवरील कित्येक पुस्तके त्यांच्या संग्रहात होती. पाश्चिमात्य तत्वज्ञांपैकी कान्ट हा त्यांचा आवडता फिलॉसॉफर असून कान्टच्या लेखनाचा त्यांनी दांडगा अभ्यास केला होता. याशिवाय शास्त्रिय संगीत ऐकणे आणि क्रिकेट मॅच पहाणे हेही त्यांचे आवडते छंद होते. ज्योतिषाच्या व्यासंगामुळे सर्व थरातील व सर्व वयातील लोकांचा त्यांच्याकडे ओढा होता व दादांनी ही कुठला भेदभाव न ठेवता सर्वांना भविष्य सूचना तसेच उपचारार्थ मंत्रपठन इत्यादी सांगताना हातचे राखून ठेवले नाही.
त्यांचे निधन झाले तेही किरकोळ सरदी-पडशाचे निमित्त होऊन. त्यांना नव्वद वर्षाचे प्रदीर्घ आयुष्य लाभले. नित्यनियमाने योगासने व प्राणायाम करीत राहील्याने शेवटपर्यंत सर्व इंद्रियव्यवहार व्यवस्थित कार्यरत होते. त्यामुळे ते अजूनही आपल्यातून गेले नाहीत असेच वाटते.

-लीना मेहेंदळे,

प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य
---------------------------------------
डॉ अग्निहोत्री यांची जन्मभूमी जरी महाराष्ट्र असली तरी त्याची कर्मभूमी महाराष्ट्राबाहेर असल्याने महाराष्ट्राला त्यांच्या कार्याचा असावी त्याप्रमाणात माहीती नाही. त्यांच्या कार्याचा थोडक्यात परीचय करून देत त्यांना वाहीलेली ही श्रद्धांजली.
डॉ.अग्निहोत्री यांचा जन्म खानदेशातील धरणगाव, ता.एरंडोल, जिल्हा जळगांव येथे १९१६ साली झाला. नुकतेच १३ फेब्रुवारी २००६ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय ९० होते, योगासने आणि ध्यानधारणा यांच्या नियमित सरावामुळे उत्तम शरीर प्रकृतीचे त्यांना वरदान होते.
डॉ.अग्निहोत्री यांचे शालेय शिक्षण धरणगांव येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे व नाशिक येथे झाले. मुंबई विद्यापिठाची एम्.ए पदवी त्यांनी संस्कृत (पुणे) व तत्वज्ञान (नाशिक) हे विषय अभ्यासून दोनदा मिळवली. नंतर मुंबईच्या विल्सन कॉलेजातील संस्कृतचे ख्यातनाम प्राध्यापक हरी दामोदर वेलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली(Investigation of Yoga and its implications found in vedic literature) या विषयावर प्रबंध लिहून १९४८ साली पी.एच.डी पदवी संपादन केली.
या सेवा काळात त्यांनी अध्यापन, मार्गदर्शन आणि संशोधन या क्षेत्रात विविध कामगिरी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १७ विद्यार्थ्यांनी प्रबंध लिहून पी.एच्.डी मिळवली. संशोधनास वाहीलेल्या विविध नियतकालिकांत, तसेच अखिल भारतीय प्राच्यविद्या परीषदेच्या अधिवेशनात त्यांचे निबंध रादर झाले. त्यांच्या व्यासंगाचे मुख्य विषय अर्थातच वेद आणि तत्वज्ञान हे होते.
भारतीय तत्वज्ञान आणि योगविद्या या विषयींच्या डॉ.अग्निहोत्री यांच्या व्यासंगाची आणि बहूश्रुततेची ओळख त्यांच्या सांख्यकारीका विवेचन, पातंजल योगसुत्र आणि योगत्रयी या तीन छोटेखानी मराठी पुस्तकांत, आणि (Buddhi Yoga) या त्यांच्या मोठ्या इंग्रजी ग्रंथात होते.

सांख्यकारीका विवेचन(२००१, पृ. ३८)- भारतीय तत्वज्ञानाच्या परंपरेतील षङदर्शनात सांख्य आणि योग या दोन दर्शनांचा प्रथम उल्लेख होतो. सांख्य तत्वज्ञानाचे प्रवर्तक कपिल मुनिंचे विचार त्यांच्यानंतर काही शतकांनी ईश्वर कृष्णानी ७२ आर्यवृत्तातील संग्रहात निबद्ध केले. डॉ.अग्निहोत्री
(incomplete)
--Dr M A Mehendale